मास्क न लावणाऱ्यांना नगर परिषदेने दिला दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:33 IST2021-03-25T04:33:47+5:302021-03-25T04:33:47+5:30
गोंदिया : कोरोनाचा वाढता उद्रेक बघता, जिल्हा प्रशासनाने आता कंबर कसली असून, मास्क न लावता फिरणारे, तसेच गर्दीच्या ठिकाणांवर ...

मास्क न लावणाऱ्यांना नगर परिषदेने दिला दणका
गोंदिया : कोरोनाचा वाढता उद्रेक बघता, जिल्हा प्रशासनाने आता कंबर कसली असून, मास्क न लावता फिरणारे, तसेच गर्दीच्या ठिकाणांवर नजर ठेवून कारवाई करण्यासाठी पथकांचे गठण केले आहे. यात नगर परिषद अधिकारी- कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पथके असून, त्यांच्याकडे विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. याअंतर्गत पथकांनी मंगळवारी (दि.२३) मास्क न लावता फिरणाऱ्या ४९ नागरिकांना दणका देत, त्यांच्याकडून ८,९०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशात कोरोनाविषयक उपाययोजनांचे पालन करणे आवश्यक झाले आहे. मात्र, त्यानंतरही जिल्ह्यात मास्क न लावता फिरणे, गर्दी करणे यासारखे प्रकार सुरूच आहेत. अशात आता नगर परिषद व महसूल विभागाने सुमारे १९ पथकांचे गठण केले असून, त्यांना विविध जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. त्यानुसार, मंगळवारी यातील ६ पथकांनी मास्क न लावता फिरणाऱ्यांवर कारवाई केली आहे. यामध्ये मास्क न लावता फिरणाऱ्या ३९ नागरिकांना प्रतिव्यक्ती १०० रुपये याप्रमाणे ३,९०० रुपयांचा दंड ठोठावून त्यांच्या दंड वसूल केला आहे. नगर परिषद आस्थापना विभागप्रमुख मनीषा पारधी यांनी पथकासह प्रशासकीय भवन येथे पाहणी करून १० अधिकारी- कर्मचाऱ्यांना प्रतिव्यक्ती ५०० रुपये याप्रमाणे ५,५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. विशेष म्हणजे, मंगळवारी उशिरापर्यंत पथकांकडून कारवाई सुरूच होती. पथकांच्या या कारवायांनंतर आता मात्र नागरिकांत कारवायांना घेऊन दहशत दिसून आली.