नागरिकांनी संविधानातील हक्काबाबत जागरूक बनावे!
By Admin | Updated: February 1, 2017 00:23 IST2017-02-01T00:23:56+5:302017-02-01T00:23:56+5:30
राजकारणी संविधानाचे नाव घेतात. पण अंमलबजावणी व पालन करत नाहीत. प्रशासनात संविधान रुजविणे गरजेचे आहे.

नागरिकांनी संविधानातील हक्काबाबत जागरूक बनावे!
ई. झेड. खोब्रागडे : १६ वे राष्ट्रीय संविधान प्रबोधन साहित्य संमेलन, बहुजन प्रबोधन मंचचे आयोजन
लाखांदूर : राजकारणी संविधानाचे नाव घेतात. पण अंमलबजावणी व पालन करत नाहीत. प्रशासनात संविधान रुजविणे गरजेचे आहे. संविधानातील हक्कासोबत नागरिकांनी कर्तव्याप्रती जागरूक बनून अवलंब करावा, असे प्रतिपादन सेवानिवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी व्यक्त केले.
बहुजन प्रबोधन मंच लाखांदूरच्या वतीने लाखांदूर येथे संविधान, धर्मनिरपेक्ष भारतात धार्मिक बहुसंख्यांक - अल्पसंख्यांक आणि आरक्षण या विषयावर १६ वे राष्ट्रीय संविधान प्रबोधन साहित्य संमेलन पार पडले. यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. श्रीपाल सबनीस, ई. झेड. खोब्रागडे, रझिया सुलतान, डॉ. सुनिल कुमार सुमन, नागेश चौधरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी सबनीस यांनी, संविधानावर साहित्य संमेलन प्रथमच बघत असल्याचे सांगितले. संविधान धर्मनिरपेक्ष आहे, परंतु संविधान राबविणारे धर्मनिरपेक्ष नाहीत, असे प्रतिपादन केले. नागेश चौधरी यांनी, देशात राजसत्ता, धर्मसत्ता, संस्कृतीसत्ता, शिक्षणसत्ता, अर्थसत्ता ज्यांच्या हाती आहे ते संविधानाचा आदर करतात का हा प्रश्न निर्माण होतो. संविधानाची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी केली असती तर देशाचे चित्र वेगळे राहिले असते. नागरिकांनी संविधानाप्रती जागृत होवून संविधानाची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करण्यास राजकारण्यांना भाग पाडावे, असे प्रतिपादन केले. सुनिलकुमार सुमन यांनी, संविधान एस.सी.एस.टी., ओबीसी आणि धार्मिक अल्पसंख्यांकाची ताकद आहे. तर उच्चवर्गीयांची कमजोरी आहे. ज्यांच्यासाठी आरक्षण आहे त्यांचे आरक्षण पूर्ण भरले गेले नाही. आरक्षण बंद करण्याचे विचार पेरले जात आहेत. म्हणून सर्व आरक्षण भगीनी एकत्र येऊन आरक्षण विरोधकांचे मनसुबे संविधानिक मार्गाने उधळून लावले पाहिजे असे प्रतिपादन केले. तर रझिया सुलतान यांनी, मुस्लिम समाजाला संविधान समजावून सांगणे गरजेचे आहे. मुस्लिमांनी ध्यानात घ्यावे की, माणसाला माणूस बनण्याचे शिक्षण भारताचे संविधान देते. म्हणून मुस्लिमांनी संविधान वाचून समजून घ्यावे, असे प्रतिपादन केले.
संमेलनाचे आयोजक अनिल कानेकर यांनी प्रास्ताविकातून संविधान प्रबोधन साहित्य संमेलन आयोजन करण्यामागची भूमिका तसेच यावर्षी चर्चेला ठेवलेल्या विषयाची भूमिका समजावून सांगितले.
संमेलनात केशवराव घोडीचोर, डॉ. जगदीश बारसागडे, डॉ. सचिन घरडे, प्रा. डॉ. रेवाराम खोब्रागडे, प्रा. डॉ. राकेश वासनिक, प्रा. डॉ. राकेश तलमले, प्रा. डॉ. विरेंद्र तुरकर, संविधान व स्मृतीचिन्ह पाहुण्यांच्या हस्ते देवून संमेलनाच्या आयोजकांनी सत्कार केला. संचालन प्रदीप भावे यांनी तर आभार उपरीकर यांनी मानले.
द्वितीय सत्रातील कवी संमेलन हरिश्चंद्र लाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यात हितेंद्र रामटेके, जयंत टेंभुर्णे, प्रा.अशोक डहाके, सपना भावे आणि इतर कविंनी महापुरुषांच्या जीवनावर वर्तमान सामाजिक परिस्थितीवर तसेच संविधानाचे गुणगाण करणाऱ्या कविता सादर करून श्रोत्यांच्या टाळ्या मिळविल्या. संचालन अजय तिडके यांनी केले. तर आभार होमकांत उपरीकर यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)