लसीचा दुसरा डोस घेण्यास नागरिक उदासीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 05:00 IST2021-07-14T05:00:00+5:302021-07-14T05:00:16+5:30
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेनंतर सर्वत्र भयभीत वातावरण निर्माण झाले होते. कोरोनावर लस हाच एकमेव उपाय आहे. मात्र त्यानंतरही नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नसल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागात तर लसीकरणाबाबत प्रचंड गैरसमज आहेत. जनजागृतीच्या माध्यमातून प्रशासनाने लसीकरण मोहीम प्रभाविपणे राबविण्याचा प्रयत्न चालविला आहे. परंतु दुसरी लस घेण्यास मात्र टाळाटाळ होत असल्याचे दिसत आहे.

लसीचा दुसरा डोस घेण्यास नागरिक उदासीन
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असतानाही लसीकरणाबाबत नागरिक उदासीन दिसत आहेत. त्यातही पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. जिल्ह्यात ४७.२१ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले असून, पात्र ५३ हजार ७७० व्यक्तींनी उद्यापही दुसरा डोस घेतला नसल्याचे पुढे आले आहे.
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेनंतर सर्वत्र भयभीत वातावरण निर्माण झाले होते. कोरोनावर लस हाच एकमेव उपाय आहे. मात्र त्यानंतरही नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नसल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागात तर लसीकरणाबाबत प्रचंड गैरसमज आहेत. जनजागृतीच्या माध्यमातून प्रशासनाने लसीकरण मोहीम प्रभाविपणे राबविण्याचा प्रयत्न चालविला आहे. परंतु दुसरी लस घेण्यास मात्र टाळाटाळ होत असल्याचे दिसत आहे.
भंडारा जिल्ह्यात नऊ लाख ७८ हजार ४४६ नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत चार लाख ६१ हजार ९८७ व्यक्तींचे लसीकरण झाले आहे. त्यात पहिला डोस घेणारे तीन लाख ४६ हजार ७३० आणि दुसरा डोस घेणारे एक लाख १५ हजार २५७ व्यक्ती आहेत. पहिला डोस घेतल्यानंतर साधारणत: तीन महिन्यांनंतर दुसरा डोस दिला जातो. परंतु पहिला डोस घेतल्यानंतर अनेक जण दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येते. पात्र ५३ हजार ७७० व्यक्तींनी दुसरा डोस घेतलेला नाही. संपूर्ण लसीकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोहीम हाती घेतली असली तरी अद्यापही ग्रामीण भागात योग्य प्रतिसाद मिळत नाही. शहरी भागात लस घेणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. परंतु तेथेही दुसरी लस घेणाऱ्यांचे प्रमाण कमीच आहे. कोरोना संसर्गाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याने प्रत्येकाने लस घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
दुसऱ्या डोससाठी गुरुवारी ४० ठिकाणी विशेष शिबिर
भंडारा : पहिली लस घेतल्यानंतर दुसरी लस घेण्यास अनेकजण टाळाटाळ करीत असल्याचे दिसून आले. संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी ही बाब गंभीर असून, जिल्हा प्रशासनाच्यावतीने शहरी व ग्रामीण भागात कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस देण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात ४० ठिकाणी गुरुवार, १५ जुलै रोजी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्यात भंडारा तालुक्यात हुतात्मा स्मारक शास्त्री चौक, कारधा, कोका, कोथुर्णा, मानेगाव, शहापूर, वाकेश्वर, गणेशपूर. लाखांदूर तालुक्यात बोथली, मांढळ, मानेगाव, पाहुणगाव, सोनी. लाखनी तालुक्यात गुरढा, खराशी, लाखोरी, शिवनी, सोमलवाडा. मोहाडी तालुक्यात डोंगरगाव, हरदोली, कांद्री, मांडेसर, नीलज. पवनी तालुक्यात भावड, चिचाळ, गोसे, लोणारा, नेरला, सिंदपुरी. साकोली तालुक्यात चांदोरी, कुंभली, परसोडी, पिंडकेपार, सानगडी. तुमसर तालुक्यात बपेरा, देव्हाडी, कवलेवाडा, महालगाव, मोहगाव आदी ठिकाणांचा समावेश आहे. याठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत लसीकरण सुरू राहील.
लसीकरणासाठी विशेष माेहीम राबवा
- कोरोना लसीचा पहिला डोस घेतला मात्र दुसरा डोस घेतला नाही अशा नागरिकांसाठी लसीकरणाची विशेष मोहीम राबविण्याची सूचना जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केली आहे. पात्र असूनही दुसरा डोस न घेणाऱ्या व्यक्तींची गावनिहाय आकडेवारी गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशा प्रत्येक व्यक्तीशी संपर्क साधून लस घेण्यासाठी प्राेत्साहित केले जाणार आहे.
लसीकरणात महिलाच आघाडीवर
- जिल्ह्यात पुरुषांच्या तुलनेत लसीकरणात महिला आघाडीवर असल्याचे दिसत आहे. चार लाख ६१ हजार ९८७ व्यक्तींनी लस घेतली असून, त्यात दोन लाख ३१ हजार ३४ महिला तर दोन लाख २९ हजार ९५३ पुरुषांनी लस घेतली आहे. भंडारा जिल्ह्यात लसीकरणात महिलांची संख्या अधिक दिसते. ग्रामीण भागातही महिला लसीकरणात आघाडीवरच आहेत.