कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यास नागरिक उदासीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:40 IST2021-07-14T04:40:47+5:302021-07-14T04:40:47+5:30
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेनंतर सर्वत्र भयभीत वातावरण निर्माण झाले होते. कोरोनावर लस हाच एकमेव उपाय आहे. मात्र त्यानंतरही नागरिक ...

कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यास नागरिक उदासीन
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेनंतर सर्वत्र भयभीत वातावरण निर्माण झाले होते. कोरोनावर लस हाच एकमेव उपाय आहे. मात्र त्यानंतरही नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नसल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागात तर लसीकरणाबाबत प्रचंड गैरसमज आहेत. जनजागृतीच्या माध्यमातून प्रशासनाने लसीकरण मोहीम प्रभाविपणे राबविण्याचा प्रयत्न चालविला आहे. परंतु दुसरी लस घेण्यास मात्र टाळाटाळ होत असल्याचे दिसत आहे.
भंडारा जिल्ह्यात नऊ लाख ७८ हजार ४४६ नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत चार लाख ६१ हजार ९८७ व्यक्तींचे लसीकरण झाले आहे. त्यात पहिला डोस घेणारे तीन लाख ४६ हजार ७३० आणि दुसरा डोस घेणारे एक लाख १५ हजार २५७ व्यक्ती आहेत. पहिला डोस घेतल्यानंतर साधारणत: तीन महिन्यांनंतर दुसरा डोस दिला जातो. परंतु पहिला डोस घेतल्यानंतर अनेक जण दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येते. पात्र ५३ हजार ७७० व्यक्तींनी दुसरा डोस घेतलेला नाही. संपूर्ण लसीकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोहीम हाती घेतली असली तरी अद्यापही ग्रामीण भागात योग्य प्रतिसाद मिळत नाही. शहरी भागात लस घेणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. परंतु तेथेही दुसरी लस घेणाऱ्यांचे प्रमाण कमीच आहे.
बॉक्स
लसीकरणासाठी विशेष माेहीम
कोरोना लसीचा पहिला डोस घेतला मात्र दुसरा डोस घेतला नाही अशा नागरिकांसाठी लसीकरणाची विशेष मोहीम राबविण्याची सूचना जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केली आहे. पात्र असूनही दुसरा डोस न घेणाऱ्या व्यक्तींची गावनिहाय आकडेवारी गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशा प्रत्येक व्यक्तीशी संपर्क साधून लस घेण्यासाठी प्राेत्साहित केले जाणार आहे.
बॉक्स
लसीकरणात महिलाच आघाडीवर
जिल्ह्यात पुरुषांच्या तुलनेत लसीकरणात महिला आघाडीवर असल्याचे दिसत आहे. चार लाख ६१ हजार ९८७ व्यक्तींनी लस घेतली असून, त्यात दोन लाख ३१ हजार ३४ महिला तर दोन लाख २९ हजार ९५३ पुरुषांनी लस घेतली आहे. भंडारा जिल्ह्यात लसीकरणात महिलांची संख्या अधिक दिसते.