जात वैधता कार्यालयात नागरिकांची पायपीट
By Admin | Updated: May 26, 2017 02:05 IST2017-05-26T02:05:51+5:302017-05-26T02:05:51+5:30
जिल्ह्यातील विद्यार्थी, नागरिकांना जात वैधता पडताळणीचे प्रमाणपत्र जिल्हा मुख्यालयी मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाने

जात वैधता कार्यालयात नागरिकांची पायपीट
अर्ज ‘रेफर टू’ नागपूर : अधिकारी-कर्मचारी सुस्त, विद्यार्थी नागरिक त्रस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील विद्यार्थी, नागरिकांना जात वैधता पडताळणीचे प्रमाणपत्र जिल्हा मुख्यालयी मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाने भंडारा जिल्ह्यात नोव्हेंबर २०१६ पासून जात वैधता पडताळणीचे स्वतंत्र कार्यालय सुरू केले आहे. मात्र अर्ज या कार्यालयात पडून असल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत.
महिनाभरापासून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील नागरिक जात वैधता पडताळणीचे अर्ज योग्यत्या दस्तऐवजासह प्रत्यक्ष हस्तपोचने सादर करीत असून तब्बल सहा महिने उलटून गेली तरी जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याने नागरिक, विद्यार्थ्यांना सदर कार्यालयाची दररोज पायपीट करावी लागत आहे. प्रमाणपत्राबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता तुम्हाला मोबाईलवर मॅजेस येईल असे सांगून नागरिक विद्यार्थ्यांची बोळवण केली जात आहे.
अधिकारी, कर्मचारी सुस्त व नागरिक त्रस्त असे या कार्यालयाचे सकृतपणे चित्र दिसून येत असून सदर कार्यालयाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याबाबत संबंधित यंत्रणेने वेळीच दखल घेवून व सम्यक विचार करून नागरिक व विद्यार्थ्यांना तात्काळ जात वैधता पडताळणीचे प्रमाणपत्र अदा करावे अन्यथा या विरोधात जिल्हाभर तीव्र जनआंदोलन करण्यात येईल व याबाबतची संपूर्ण जबाबदारी शासन प्रशासनाची राहील, असा इशारा भंडारा जिल्हा विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष अशोक कान्हेकर, अनिल मेश्राम, धनराज कान्हेकर, अशोक फुलेकर, राज मेश्राम, गौतम कान्हेकर, बुद्धपाल डहाट यांनी दिला आहे.
शिक्षण, नोकरी व निवडणूक कार्यायासाठी जात वैधता पडताळणी प्रमाणपत्राची नितांत गरज असते. त्यासाठी अर्जदार हे योग्य त्या दस्ताऐवजासह अर्ज भंडारा येथील जात वैधता प्रमाणपत्र कार्यालयात प्रत्यक्ष हस्तपोचने सादर करीत असतात.
भंडारा येथे नोव्हेंबर महिन्यापासून जात वैधता पडताळणीचे स्वतंत्र कार्यालय सुरू झाले तेव्हापासून नागरिकांनी अर्ज सादर केले. त्यानुसार सदर अर्जावर संबंधित यंत्रणेने कार्यवाही करून अंतिम कार्यवाहीसाठी सदर प्रस्ताव नागपूर येथील कार्यालय रेफर केले असून मागील सहा महिन्यापासून सदर प्रस्ताव अंतिमरित्या निकाली निघत नसल्याने व प्रमाणपत्रावर संबंधित जबाबदार अधिकाऱ्याची स्वाक्षरी होत नसल्याने बरेच प्रस्ताव नागपूर येथील कार्यालयात धूळ खात असल्याने विद्यार्थी व नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागत असून सदर कार्यालयाच्या हेतुपूरस्पर अक्षम्य दुर्लक्षामुळे भंडारा जिल्ह्यातील नागरिकांचे अर्ज ‘रेफर टू’ नागपूर करीत आहेत.