घाण पाण्यामुळे नागरिक त्रस्त
By Admin | Updated: August 13, 2014 23:38 IST2014-08-13T23:38:58+5:302014-08-13T23:38:58+5:30
शहरातील मध्यवती ठिकाण असलेल्या तकिया वॉर्डातील साई मंदीरच्या मागील परिसरात एका खाजगी जागेवर मोठ्या प्रमाणात सांडपाणी व नैसर्गीक पाणी जमा होते. यामुळे वसाहतीतील

घाण पाण्यामुळे नागरिक त्रस्त
भंडारा : शहरातील मध्यवती ठिकाण असलेल्या तकिया वॉर्डातील साई मंदीरच्या मागील परिसरात एका खाजगी जागेवर मोठ्या प्रमाणात सांडपाणी व नैसर्गीक पाणी जमा होते. यामुळे वसाहतीतील नागरिकांना पावसाळ्यात मन:स्ताप सहन करावा लागतो.
नगरपालिका प्रशासनाच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक २४ मध्ये येणारा साई मंदिरामागे व ओम हॉस्पिटल असलेल्या परिसरातील तकिया वॉर्डात नवीन वसाहत आहे. येथे सुमारे २५ कुटूंब वास्तव्याला आहे. सुमारे दोन हजारपासून ही वसाहत अस्तित्वात आली आहे. शफी शेख नामक डेव्हलपर्सकडून प्लॉट विकत घेवून नागरिकांनी वसाहत उभारली आहे. या वसाहतीला लागून एका व्यक्तिचा रिकामा भुखंड आहे. या भुखंडात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. सदर पाणी बाहेर जाण्याचा मार्ग नसल्याने ते सरळ या वसाहतीत येते.
सदर वसाहतीतील काही भागात सिमेंट काँक्रेट व सांडपाण्याची व्यवस्था होण्याच्या दृष्टीने नाल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र एका भागात नाल्याचे बांधकाम न करताच नगरपालिकेने सिमेंट काँक्रीट रोडचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे या घरांमधून निघणारे मलमुत्र व सांडपाणी रस्त्यावरून वाहते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. याबाबत येथील वसाहतधारकांनी नगर पालिका प्रशासन व नगराध्यक्षांना वारंवार सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी नाल्यांची निर्मिती करावी व खाजगी भुखंडात साचत असलेल्या पाणी जाण्यासाठी मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी केली. मात्र त्यांच्याकडून थातुरमातूर उत्तरे देण्यात येत असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या परिसरात असलेल्या रिकाम्या भुखंडात मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा निर्माण झाला आहे. ते सर्व पाणी या वसाहतीतील रस्त्यावरून काहींच्या घरात जात आहे. यासोबतच या पाण्याच्या माध्यमातून साप, विंचू व अन्य किटकांचा धोका येथील रहिवाशांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दूषित पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने ते आरोग्यास हानिकारक आहे. त्यामुळे सदर गंभीर बाबीचा विचार करून नगरपालिका प्रशासनाने येथील नागरिकांना आरोग्यसुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सांडपाणी व साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने मदत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)