नाताळ : आनंद आणि उल्हासाचा सण...

By Admin | Updated: December 25, 2016 00:43 IST2016-12-25T00:43:04+5:302016-12-25T00:43:04+5:30

नाताळ सण म्हणजे २५ डिसेंबर. आपल्या अमावास्या, पौर्णिमा या तिथी जशा चंद्रावर अवलंबून असतात, तसा प्रकार इसवीसनाच्या ...

Christmas: The festival of joy and laughter ... | नाताळ : आनंद आणि उल्हासाचा सण...

नाताळ : आनंद आणि उल्हासाचा सण...


येशू जन्मानिमित्त सामूहिक प्रार्थना : चर्चवर विद्युत रोषणाई, ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र सण, शहरात ख्रिसमस ट्री सजले



प्रशांत देसाई ल्ल भंडारा

येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस ६ जानेवारीऐवजी २५ डिसेंबर मानावा, असा निर्णय सुमारे साडेसोळाशे वर्षांपूर्वी पोप यांनी दिला. तेव्हापासून हा दिवस ख्रिसमस (नाताळ) म्हणूून साजरा केला जातो. ख्रिसमसचा मूळ अर्थ म्हणजे येशूच्या जन्मानिमित्त करण्यात येणारी सामूहिक प्रार्थना. रविवार, दि. २५ रोजी नाताळ साजरा होत आहे. त्यानिमित्त...

नाताळ सण म्हणजे २५ डिसेंबर. आपल्या अमावास्या, पौर्णिमा या तिथी जशा चंद्रावर अवलंबून असतात, तसा प्रकार इसवीसनाच्या ख्रिस्ती कालगणनेत नाही. तिथे सूर्यभ्रमणालाच अधिक महत्त्व आहे आणि २५ डिसेंबरला आपले सूर्य नेहमीपेक्षा थोडा कमीच वेळ दर्शन देत असतो.

२१ डिसेंबर हा वर्षातील सर्वात छोटा दिवस. दिवस छोटा याचा अर्थ रात्र मोठी. त्यामुळे २५ डिसेंबरची रात्र ही तुलनेने मोठीच असणार. या मोठ्या रात्रीत मेणबत्त्या पेटवाव्यात, आनंदोत्सव साजरा करावा, असे कोणाला वाटले तर ते योग्यच ठरेल. शिवाय हा दिवस येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस.

आता येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून हा दिवस मानला जात असला तरी, पूर्वी येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस ६ जानेवारी मानला जात असे. जवळपास साडेसोळाशे वर्षांपूर्वी त्यावेळच्या पोप यांनी हा दिवस २५ डिसेंबर मानावा, असा निर्णय दिला. त्यांनी येशू ख्रिस्ताचा जन्मदिन २५ डिसेंबर रोजी साजरा करावा, असे फर्मान काढले आणि त्यावेळेपासून हा दिवस २५ डिसेंबरला साजरा केला जाऊ लागला. जगभरातील ख्रिस्त अनुयायी या दिवशी आनंद व्यक्त करतात. साधू, संत, महात्मे यांची जयंती साजरी करण्याची प्रथा आणि परंपरा सर्व जगभर पाळली जाते.

जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात ख्रिसमसचा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर या धर्ममताचे काही अनुयायी, काही पंथ हे मात्र २५ डिसेंबरच्या सायंकाळी हा दिवस साजरा करतात. भारतीय धर्म-संस्कृतीशी ऋणानुबंध जोडून दाखविणारा आणखी एक विशेष या २५ डिसेंबरशी निगडित आहे. प्राचीन काळात रोम राज्यात २५ डिसेंबर हा दिवस सूर्याची जयंती म्हणून मानला जात होता.

काळोख म्हणजे अंधार हा माणसाला भयप्रद वाटतो. तो जणू आपला शत्रू आहे, अशी भावना माणसाच्या मनात पूर्वापार रूजलेली आहे. अंधार दूर करून सगळीकडे प्रकाशाची उधळण करीत वावरणारा सूर्य म्हणजे आपला मित्र वाटतो. सूर्याचे एक नावच मुळी मित्र असे आहे. आपली धर्मसंस्कृती सूर्यपूजक आहे. २५ डिसेंबर या दिवशी प्राचीन रोम संस्कृतीने सूर्याशी जसे नाते जोडून ठेवले, त्याचप्रमाणे मोठ्यात-मोठ्या दिवसाशी आपल्या मोठयात-मोठ्या सणाचे नाते जोडून ख्रिस्तानुयायांनी एक सांधा जोडून घेतला आणि जाणता-अजाणता त्यांच्याकडून जोडला गेला, असे म्हटले पाहिजे. ख्रिश्चन धर्मियांसाठी अत्यंत पवित्र असणारा आणि आनंदोल्हासाचा सण असणाऱ्या नाताळचा अर्थात ख्रिसमसचा मूळ अर्थ आहे, ख्राईस्ट मास. याचा अर्थ येशूच्या (ख्रिस्त) जन्मानिमित्त करण्यात येणारी सामूहिक प्रार्थना. पण नाताळ केवळ प्रार्थनेपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो एक सण झाला आहे. दरवर्षी २५ डिसेंबर ख्रिश्चन जगतात अतिशय हर्षाेल्हासाने साजरा केला जातो. ख्रिस्तापूर्वी रोम राज्यात पंचवीस डिसेंबरला सूर्यदेव, डायनोसियसच्या प्रार्थनेसाठी मोठा उत्सव होत असे. इसवीसनाच्या पहिल्या शतकात लोक येशूचा जन्मदिवस २५ डिसेंबरला साजरा करू लागले. पुढे या उत्सवाची परंपरा निर्माण झाली.

२४ व २५ डिसेंबरच्या दरम्यानची रात्र येशूच्या आराधनेत जागवली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळीच जन्मोत्सव साजरा केला जातो. एकमेकांची गळाभेट घेऊन लोक परस्परांना शुभेच्छा देतात. प्रसाद ग्रहण केला जातो. चर्चमध्ये ख्रिसमस ट्री सजविला जातो. लखलखत्या दिव्यांची तोरणे घराघरांना, चर्चेसला लागतात. खरे तर सध्या साजरा केला जातो तशा पद्धतीचा ख्रिसमस १९ व्या शतकात साजरा व्हायला लागला. ख्रिसमस ट्री पूर्वी फक्त जर्मनीत असायचे. ख्रिसमसमध्ये कॅरोल्सचा समावेश ब्रिटनमध्ये प्रिन्स अल्बर्टने केला होता. यादिवशी आतषबाजीची परंपरा टॉम स्मिथने सुरू केली. १८४६ मध्ये ख्रिसमस कार्ड बनविले गेले. १८७० पर्यंत त्याचा प्रसार सर्वत्र झाला. सांताक्लॉजचा उल्लेख १८६८ मध्ये एका नियतकालिकात वाचायला मिळतो.



 

Web Title: Christmas: The festival of joy and laughter ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.