दोन कोटींच्या वास्तूचा चुराडा

By Admin | Updated: August 27, 2015 00:52 IST2015-08-27T00:52:28+5:302015-08-27T00:52:28+5:30

जनतेचा पैसा जनतेच्या हितार्थ लावला पाहिजे, असा जनसामान्य अर्थ शासकीय स्तरावर लावला जातो.

Chorada of two crore house | दोन कोटींच्या वास्तूचा चुराडा

दोन कोटींच्या वास्तूचा चुराडा

इंद्रपाल कटकवार भंडारा
जनतेचा पैसा जनतेच्या हितार्थ लावला पाहिजे, असा जनसामान्य अर्थ शासकीय स्तरावर लावला जातो. परंतु भंडारा नगरपालिकेने हा सर्वसामान्य नियम पायदळी तुडविलेला दिसतोय. भंडारा बसस्थानक परिसराला लागून असलेल्या जुन्या कांजी हाऊस ाधील जागेत दोन कोटींचा खर्च करून २४ व्यापारी गाळ्यांचे बांधकाम केले. चार वर्षांचा कालावधी लोटला असला तरी आज हे गाळे फक्त शोभेची वास्तू ठरत आहे. जनतेचे दोन कोटी रूपये खर्चुन नगरपालिकेने काय साध्य केले, हा खरा प्रश्न आहे.
सामान्य माणसाच्या जीवनात पाई अन् पाई जमा करायला त्याला अतोनात संघर्ष करावा लागतो. त्यातही कमाईचा हिस्सा कराच्या रूपाने शासनाला दिला जातो. असे असतानाही त्या हाडामासाच्या संघर्षाची कमाई ‘सामान्य माणसाचे प्रशासन’ कशी व्यर्थ वाया घालविते याचे ज्वलंत उदाहरण ही कांजी हाऊसमधील व्यापारी गाळ्यांना पाहून देता येईल. सन २०१० - ११ मध्ये नगर पालिकेच्यावतीने बसस्थानक परिसराला लागून असलेल्या कांजी हाऊस मध्ये व्यापारी गाळ्यांचे निर्माण केले. या कांजी हाऊसमध्ये मांडण्यात आलेल्या व्यापारी गाळ्यांची संख्या २४ आहे. सन २०१० मधील तत्कालीन अधिकाऱ्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या कांजी हाऊसबाबतच्या बांधकामाबाबत भविष्यकालीन दृष्टी पडद्याआड गेली होती काय? असेच म्हणावे लागेल. गाळ्यांचे बांधकाम करण्यासाठी नागरिकांच्या हक्काचे दोन कोटी रुपयांची अक्षरश: वाट लावण्यात आली. भंडारा बसस्थानक चौक ते सामान्य रुग्णालयाकडे जाणाऱ्या उजव्या हातावर ही प्राचीन इमारत आहे. या इमारतीचे प्रवेशद्वार इंग्रजकालीन असून पूर्वी येथून चुंगी वसुली केली जायची. काळाच्या ओघात यानंतर इथे कांजी हाऊस निर्माण करण्यात आले. विशेष म्हणजे ही इमारत रस्त्याच्या ५० फुट आत आहे. बांधकाम करण्यात आलेल्या गाळ्यांच्या उत्तर म्हणजेच रस्त्याच्या भागावर व्यापारी गाळे आहेत. हे गाळे आजच्या स्थितीत जीर्ण झाले आहेत. जेव्हा कांजी हाऊसमधील नवीन गाळे बांधण्यात आले तेव्हा जुन्या गाळ्यांचा विचार करण्यात आला नाही. जुने झालेल्या गाळ्यांची स्थिती चांगली नाही. आज हयात असलेले जीर्ण गाळ्यांमधील व्यापाऱ्यांनी सदर व्यापारी गाळ्यांची जागा आम्हाला देऊन त्याबद्दल शासकीय नियमाप्रमाणे वसुली करावी अशी विनंती केली होती. मात्र ओले हात करण्याच्या दृष्टीकोणातून की अन्य कोणत्या कारणातून उपयोग नसतानाही व नियोजनशून्य नियोजनातून बांधकाम करण्यात आले. परिणामी बांधण्यात आलेल्या व्यापारी गाळे आजच्या स्थितीला भंगाराच्या अवस्थेत आहेत.
विशेष म्हणजे या व्यापारी गाळे असलेल्या भागात खुलेआम दारु, चरस व जुगार खेळण्यात येतो. काही दिवसांपूर्वीच शहरात घडलेल्या घटनांमुळे पोलिसांनी या परिसरातही छापामार कारवाई केली होती. या परिसरात आजही तासपत्ते, दारुच्या बाटल्या हमखासपणे दिसून येतात. येथे मोठ्या प्रमाणात घाणही दिसून येते. या जागेचा वापर लघुशंकेसाठीही करण्यात येतो. इंग्रजकालीन व ऐतिहासिक वास्तूला आज संपूर्णत: गालबोट लागले आहे. दोन कोटींचा चुराडा करून नगरपालिका प्रशासनाने कुणाचे घर भरले? ही बाब चौकशी झाल्यास आपोआप समोर येईलच.

Web Title: Chorada of two crore house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.