चितळ मृत्यू प्रकरणाची चौकशी आजपासून
By Admin | Updated: February 27, 2017 00:27 IST2017-02-27T00:27:26+5:302017-02-27T00:27:26+5:30
कोका वनक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या इंजेवाडा शेतशिवारात मृतावस्थेत आढळून आलेल्या चितळाच्या शिकार प्रकरणाच्या चौकशीचे सीसीएफचे आदेश ....

चितळ मृत्यू प्रकरणाची चौकशी आजपासून
प्रकरण इंजेवाडा येथील : मोठे मासे गळाला लागण्याच्या चर्चेला उधाण
भंडारा : कोका वनक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या इंजेवाडा शेतशिवारात मृतावस्थेत आढळून आलेल्या चितळाच्या शिकार प्रकरणाच्या चौकशीचे सीसीएफचे आदेश साकोलीचे सहाय्यक वनसंरक्षक मनोहर गोखले यांना प्राप्त झाले असून याची चौकशी काल सोमवारपासून (२७ फेब्रुवारी) प्रारंभ होत आहे
मृत व्यक्तींच्या नावावर रक्कम लाटल्याचे प्रकरणासह अन्य कारणामुळे सध्या वनविभाग चर्चेत असतानाच १४ फेबु्रवारीला दुसरे अन्य प्रकरण उघडकिला आले. दुसरीकडे वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी मात्र दोषींना ‘क्लीन चीट’ देण्याचा सपाटा सुरू केला आहे. १४ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीच्या सुमारास कोका वनक्षेत्रांतर्गत येणाऱ्या इंजेवाडा येथील शेतशिवारात मादा चितळाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. १५ फेबु्रवारी रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, हे प्रकरण येथेच दाबण्यासाठी चितळाला धोटे नामक शेतकऱ्याच्या शेतात पुरण्यात आले.
शेतात खड्डा करण्यासाठी कोका विश्रामगृहावरून वनमजुरांना बोलविण्यात आले होते. वनमजुरांच्या हातानेच त्याला पुरण्यात आले. दरम्यान, या घटनेची तक्रार करडी येथील राजू तुमसरे व इंजेवाडा येथील वन्यजीव प्रेमींनी दुरध्वनी संदेशाव्दारे वरिष्ठांकडे केल्यानंतर हादरलेल्या वनकर्मचाऱ्यांनी १६ फेबु्रवारीला शेतात पुरलेला चितळाचा मृतदेह बाहेर काढला.
त्यानंतर हातझाडे यांच्या ट्रॅक्टरमध्ये मृत चितळाला घालून त्याला कोका विश्रामगृहात आणण्यात आले. त्यानंतर त्याचा मृतदेह जाळण्यात आला. मृत चितळाचे शवविच्छेदन करण्यात आले नाही, अशी माहिती आहे. परंतु, शवविच्छेदन केल्याचे प्रमाणपत्र वन विभागाकडे आहे. त्यामुळे ते प्रमाणपत्र बनावट तर नाही ना? चितळाचे खरोखर शवविच्छेदन करण्यात आले किंवा नाही, याची चौकशी आता केली जाणार आहे. या प्रकरणात वन अधिकारी व शवविच्छेदनाचे प्रमाणपत्र देणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. तसेच या सर्व प्रकरणात चौकीदार मारोती आगाशे, वनपाल, वनरक्षक यांचेही बयाण नोंदविण्यात येणार असल्याने मोठे मासे गळाला लागण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. चौकशीअंती दोषींवर कोणती कारवाई केली जाते, याकडे वन्यप्रेमींसह सर्वांचे लक्ष लागून आहे. (नगर प्रतिनिधी)