करडी (पालोरा) : ऊसाची वाहतूक करुन जात असलेल्या ट्रॅक्टरखाली दबून एका १३ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. अक्षय मारोती काशिवार रा. इंजेवाडा असे मृताचे नाव आहे. ही घटना काल बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास मोहाडी तालुक्यातील बोंडे शिवारात घडली. इंजेवाडा येथील रहिवासी मंगेश काशिवार हे ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. ३६ - ७३६५ ने ऊस घेऊन वैनगंगा साखर कारखान्याकडे जात होते. यावेळी अक्षय हा त्यांच्या सोबत ट्रॅक्टरच्या इंजिनवर बसला होता. यावेळी त्याचा तोल गेल्याने तो खाली पडला. याचवेळी तो ट्रॅक्टरच्या मागील चाकात सापडला. त्याला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी अक्षयला मृत घोषित केले.बोंडे येथील पोलीस पाटील रामदास कोडवते यांच्या तक्रारीवरून मोहाडी पोलिसांनी ट्रॅक्टरचालक मंगेश काशीवार याच्याविरुद्ध भादंविच्या २७९, ३०४ (अ) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अक्षय हा जांभोरा येथील जय संतोषी शाळेतील इयत्ता आठवीचा विद्यार्थी होता. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. तपास सहाय्यक फौजदार अश्वीन मेहर व हवालदार आसाराम नंदेश्वर करीत आहेत. (वार्ताहर)कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्याभंडारा : ग्रामीण बँकेचे कर्ज व सततची नापिकी याला कंटाळून एका ६३ वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. मुरलीधर मारोती हटवार रा.मांगली ता.पवनी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना दि. ११ रोजी उघडकीस आली. हटवार यांच्याकडे ग्रामीण बँकेचे १७ हजार रुपयांचे कर्ज आहे. नापिकीमुळे कर्ज कसे फेडायचे, याच विवंचनेत विषारी औषध प्राशन केले. ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. प्रमोद हटवार याच्या तक्रारीवरून मर्ग दाखल केला.
ट्रॅक्टरखाली दबून बालकाचा मृत्यू
By admin | Updated: March 13, 2015 00:39 IST