‘बालदिन’ स्पर्धेतील मुलांना बक्षिसांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:54 IST2021-01-08T05:54:15+5:302021-01-08T05:54:15+5:30
मोहाडी : विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांचा विकास करण्यासाठी बाल दिवस सप्ताह निमित्त शासनाकडून विविध उपक्रम घेण्यात आले. उपक्रमासाठी ...

‘बालदिन’ स्पर्धेतील मुलांना बक्षिसांची प्रतीक्षा
मोहाडी : विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांचा विकास करण्यासाठी बाल दिवस सप्ताह निमित्त शासनाकडून विविध उपक्रम घेण्यात आले. उपक्रमासाठी पारितोषिक देण्यात येणार होते. ५५ दिवस उलटूनही स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसांची प्रतीक्षा आहे.
१४ नोव्हेंबर हा दिवस पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिवस म्हणून साजरा करण्यात येतो. बालदिवसाच्या निमित्ताने राज्यात इयत्ता १ ली ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत शासनाच्या वतीने बालदिवस सप्ताह साजरा करण्यात आला होता. या सप्ताहात भाषण, पत्रलेखन, स्वलिखित कविता वाचन, नाट्यछटा, पोस्टर स्पर्धा, निबंध लेखन, नेहरूंच्या जीवनावर चित्रफीत तयार करणे, बालसाहित्य ई-संमेलन हे उपक्रम घेण्यात आले होते. या उपक्रमासाठी तालुकास्तर, जिल्हास्तर, राज्यस्तर अशी निवड समिती तयार करण्यात आली होती. तालुक्याच्या निवड समितीने सहभाग घेतलेल्या उपक्रमाचे परीक्षण केले. स्पर्धेत सर्व सहभागी स्पर्धकांच्या उपक्रमाला गुणानुक्रम देण्यात आले. ते सर्व उपक्रम परीक्षण करून जिल्हास्तरावर पाठविण्यात आले. उपक्रमातील विजेत्या विद्यार्थ्यांना चार गटात विभागून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात येणार होते. तालुकास्तरावर चार गटासाठी ९,९००, जिल्हास्तरावरच्या चार गटासाठी १२,७०० व राज्यस्तरावरील चार गटासाठी ३६ हजार रुपये पारितोषिकेच्या स्वरूपात विद्यार्थ्यांना देण्यात येणार होते. तसेच उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार होते. उपक्रमाचा खर्च समग्र शिक्षा योजनेतील उपलब्ध निधीतून भागविण्याचे निर्देश शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी दिले होते. ही स्पर्धा होऊन ५५ दिवस झाले आहेत. या स्पर्धेत भाग घेणारे विद्यार्थी आपल्या उपक्रमाचा निकाल कधी जाहीर होतो. तसेच कधी पुरस्काराची रोख रक्कम व सहभाग प्रमाणपत्र मिळते, याची प्रतीक्षा करीत आहेत.
बॉक्स
अनेक विद्यार्थी वंचित
कोरोना काळात बालदिन सप्ताह राबविण्यात आला होता. या उपक्रमात बऱ्याच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पण, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर यावर उपक्रम अपलोड करावयाचे होते. ते उपक्रम विद्यार्थ्यांनी अपलोड केले. मात्र परीक्षण करताना ते उपक्रम ओपन होत नसल्याने अनेक सहभागी मुले स्पर्धेतून बाहेर पडली .
अजूनही तालुकास्तरावर निकाल दिला गेला नाही. तसेच उपक्रमाची रक्कमही मिळालेली नाही.
- विनोद चरपे, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मोहाडी