मुलांप्रमाणे मुलीसुद्धा वंशाचा दिवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2017 00:34 IST2017-03-09T00:34:15+5:302017-03-09T00:34:15+5:30
महिलांनी विविध क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना त्यापेक्षा अधिक प्रगती केल्याचे आज पाहायला मिळत आहे.

मुलांप्रमाणे मुलीसुद्धा वंशाचा दिवा!
जागतिक महिला दिन : सायकलपटूसह अंगणवाडी सेविकांचा सत्कार, जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन
भंडारा : महिलांनी विविध क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना त्यापेक्षा अधिक प्रगती केल्याचे आज पाहायला मिळत आहे. मुलगा हाच कुटूंबाचा आधार किंवा वंशाचा दिवा आहे, ही संकल्पना कालबाह्य झाली असून जगाच्या पाठीवर महिलांनी केलेली अभूतपूर्व प्रगती पाहता मुली वंशाचा दिवा ठरत आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद भंडारा यांच्या वतीने आयोजित जागतिक महिला दिन व जिल्हास्तरीय महिला मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर या होत्या. यावेळी मंचावर मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. अहिरे, महिला व बालकल्याण सभापती शुभांगी रहांगडाले, कषि व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे, जिल्हा परिषद सदस्या जया सोनकुसरे, रेखा ठाकरे, गीता माटे, चित्रा सावरबांधे, वंदना पंधरे, रेखा वासनिक, निळकंठ कायते, उत्तम कळपाते, व महिला व बालविकास अधिकारी सुरेश ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
महिला मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी यांचे हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. जिल्हाधिकारी म्हणाले, आज हा महिलाशक्तीच्या कर्तृत्वाचा सोहळा असून महिलांनी विविध क्षेत्रात यश संपादन करुन समाजापुढे आदर्श ठेवला आहे. महिला कुठल्याही क्षेत्रात दुर्बल नसून त्यांना पोषक वातावरण तयार करुन दिल्यास त्या पुरुषांपेक्षा अधिक उंच झेप घेऊ शकतात. शासनाने महिलांच्या प्रगतीच्या व सक्षमीकरणाच्या अनेक योजना आखल्या आहेत. या योजनांची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठीच्या योजनांची योग्य अंमलबजावणी करुन महिलांचे प्रश्न व समस्या सोडविण्याचा आपण निर्धार करु या, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर म्हणाल्या, स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची मोठी छाप सोडली आहे. जिल्हा परिषद सारख्या संस्थांमध्ये महिलांनी अतिशय उत्कृष्ट कार्य करुन समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. संधी मिळाल्यास त्या संधीचे सोने करण्याची क्षमता महिलांमध्ये असल्यामुळे राजकारण, प्रशासन, कला, संस्कृती व ज्ञानदान अशा क्षेत्रात महिलांनी सर्वोच्च स्थान भूषविले आहे. महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आपण कटिबध्द होऊ या, असे त्या म्हणाल्या. जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने महिला व बालकल्याण विभागातर्फे सायकलपटू सुशीकला आगाशे, अंगणवाडी सेविका मंदा घरत, हायमा नूर मोहम्मद शेख, कल्पना साठवणे, कल्पना सोनपिंपरे, करिश्मा उईके व आशा भूते यांचा सत्कार करण्यात आला. तुमसर प्रकल्पाच्या वतीने लेक वाचवा या कलापथकाच्या माध्यमातून ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेचे महत्व पटवून देण्यात आले. शुभांगी रहांगडाले म्हणाल्या की, महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने महिलांच्या विकासाच्या विविध योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ घेवून महिलांनी विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे. यावेळी जिल्हयातील विविध क्षेत्रातील तसेच बचत गटाच्या महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमात महिला सक्षमीकरणावर विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. प्रास्ताविक सुरेश ठाकरे यांनी केले. (प्रतिनिधी)