ट्रॅक्टरखाली चिरडून बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2016 00:35 IST2016-02-24T00:35:38+5:302016-02-24T00:35:38+5:30
दुचाकीस्वारांना ट्रॅक्टरने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोन वर्षीय बालकाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाला.

ट्रॅक्टरखाली चिरडून बालकाचा मृत्यू
आई व मामा जखमी : भोजापूर येथील घटना, चालक फरार
भंडारा : दुचाकीस्वारांना ट्रॅक्टरने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोन वर्षीय बालकाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाला. तर त्याची आई व मामा जखमी झाले. ही घटना भोजापूर येथे सोमवारला सायंकाळी घडली.
अंशुल महेश नखाते असे मृतक बालकाचे नाव आहे. अंशुल हा त्याची आई कवितासह आजोळी गेला होता. सोमवारला आई कविता, मामा क्रिष्णा भोयरसह तो दुचाकी एमएच ४० एव्ही ११५३ ने सेलोटपार येथून भोजापूर येथे परत येत होते. दरम्यान नागपूर नाका मार्गावरून त्यांनी कच्चा रोड भोजापूरकडे दुचाकी वळविली. यावेळी विरूद्ध दिशेने आलेल्या ट्रॅक्टर एमएच ३६ डी ९४७४ ने दुचाकीला जबर धडक दिली. यात अंशुल हा ट्रॅक्टरखाली आल्याने त्याचा घटनास्थळीच अंत झाला. तर त्याची आई व मामा जखमी झाले.
घटना कळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. दरम्यान चालकाने घटनास्थळावर ट्रॅक्टर सोडून पळ काढला.
नागरिकांनी जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र अंशुलच्या आईची प्रकृती अत्यवस्थ असल्याने तिला नागपूरला हलविण्यात आले आहे. भंडारा पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे. ट्रॅक्टरचालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. (शहर प्रतिनिधी)