धानपिकांसाठी रसायनयुक्त पाणी!
By Admin | Updated: August 30, 2016 00:21 IST2016-08-30T00:21:51+5:302016-08-30T00:21:51+5:30
वाहत्या नाल्यात एका कारखान्यातील विषारी रसायनयुक्त पाणी सोडण्यात आले. सध्या धानपिकाला पाण्याची गरज आहे.

धानपिकांसाठी रसायनयुक्त पाणी!
तुमसर : वाहत्या नाल्यात एका कारखान्यातील विषारी रसायनयुक्त पाणी सोडण्यात आले. सध्या धानपिकाला पाण्याची गरज आहे. विषारी पाणी पिकांना कसे द्यावे असा प्रश्न देव्हाडी शिवारातील शेतकऱ्यांना पडला आहे. वारंवार रसायनयुक्त पाणी सोडणाऱ्या कारखान्यावर कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
देव्हाडी शिवारात तुमसर - गोंदिया राज्य महामार्गावर एक औषध निर्माण करणारा कारखाना आहे. कारखान्याशेजारी एक नाला वाहतो. या नाल्यात कारखान्यातील रसायनयुक्त पाणी सोडण्यात येते. या पाण्याची दुर्गंधी येते. शेतकरी सध्या धान पिकाकरिता पाण्याची नितांत आवश्यकता आहे. नाल्यात रसायनयुक्त पाणी असल्याने धानपिकाला पाणी कसे द्यावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. दोन वर्षापूर्वी रसायनयुक्त पाणी धान पिकाला दिले होते. तेव्हा धान मळणी केल्यावर त्या तांदळाची दुर्गंधी येत होती.
शेतकऱ्यांनी सर्व तांदूळ फेकून दिले होते हे विषेश. येथील शेतकऱ्यांत असंतोष आहे. कारखाना प्रशासन सतत रसायनयुक्त पाणी सोडत असून प्रशासनाकडून कोणतीच दखल आजपर्यंत घेण्यात आली नाही. शेकडो शेतकऱ्यांचे पिक पाण्याअभावी धोक्यात आले आहे.
पर्यावरणाची येथे मोठी हानी होत आहे. गुरांना पिण्याकरिता पाणी नाही. नियमानुसार कारखाना प्रशासनाने रसायनयुक्त पाणी निष्प्रभ करण्याची गरज आहे. प्रदूषण व पर्यावरण विभागाचे जबाबदार अधिकारी भेट देतात. परंतु क्लिन चीट देण्याचेच येथे सुरु आहे. रसायनयुक्त पाणी नाल्यात सोडताच येत नाही. शासनाचे अतिशय कडक नियम आहेत. परंतु येथे या नियमांचा काहीच उपयोग होताना दिसत नाही. (तालुका प्रतिनिधी)
शेतकऱ्यांची तक्रार आल्यावर तिची दखल घेऊन चौकशी करण्यात येईल. नियमानुसार संबंधित कारखान्याला जाब विचारून नियमानुसार निश्चित कारवाई करण्यात येईल.
- डी.टी. सोनवाने
तहसीलदार, तुमसर.