शहरात रसायनमिश्रित पाण्याचा पुरवठा
By Admin | Updated: August 6, 2015 01:45 IST2015-08-06T01:45:36+5:302015-08-06T01:45:36+5:30
दीड लक्ष लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरात नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे पिण्याच्या पाण्याचा पिवळसर - काळसर पुरवठा केला जात आहे.

शहरात रसायनमिश्रित पाण्याचा पुरवठा
महिलांमध्ये संताप : नाग नदीच्या पाण्याचा भंडारावासीयांना फटका
भंडारा : दीड लक्ष लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरात नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे पिण्याच्या पाण्याचा पिवळसर - काळसर पुरवठा केला जात आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्न केव्हाही ऐरणीवर येऊ शकतो. सरळसरळ मानवी आरोग्याशी जुळलेल्या या प्रश्नावर पालिका प्रशासन गंभीर आहे की नाही, हा विषय चर्चेचा असला तरी पिवळसर पाण्याचा पुरवठा का होतो? व कुठल्या प्रकाराने होतो यासाठी पाण्याची तपासणी प्रयोगशाळेत केली जाणार आहे. यासाठी पाण्याचे नमुने पाठविण्यात आल्याची माहिती असून अहवाल आल्यानंतरच उपाययोजना केली जाण्याचे संकेत आहेत.
वैनगंगा नदीच्या पात्रातून पाण्याचा उपसा करून भंडारेकरांना पाण्याचा पुरवठा केला जातो. पुरवठा करण्यापूर्वी ग्रामसेवक कॉलनीस्थित असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात पाण्याचे शुद्धीकरण केले जाते. पाण्याचे शुद्धीकरण केले जात आहे तर भंडारेकरांना मिळणारे पाणी हे पिवळसर का असते हा एक प्रश्न सर्वांनाच मागील दोन वर्षांपासून भेडसावत आहे. शहरातील काही भागात काळसर तर कुठे तेलयुक्त पाणीही मिळत आहे. पाण्याच्या या पुरवठ्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. गर्भश्रीमंत फिल्टरद्वारे पाणी शुद्ध करून पित आहेत. मात्र गरिबांचे काय, असा सवाल जनसामान्यांना पडला आहे. यासंबंधी नगरपालिका प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागाने पिवळसर पाण्याचा पुरवठा का होत आहे यासाठी पाण्याचे नमुने ‘नीरी’ व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे तपासणीसाठी पाठविले असल्याची माहिती आहे. वैनगंगा नदीतून पाण्याचा उपसा केल्यानंतर शुद्धीकरण केले जाते. शुद्धीकरण दरम्यान पाण्यात क्लोरिन मिसळविल्यानंतर त्याचा रंग पिवळसर होत असल्याचे प्रथम सुकृतदर्शनी अधिकारी सांगत आहेत.
दुसरीकडे वैनगंगा नदीत गोसेखुर्द धरणाचे ‘बॅक वॉटर’ भंडारा नदीपात्रापर्यंत पोहचलेले असल्याने त्यात नाग नदीच्या पाण्याचा शिरकाव झाला आहे. याउपरही भंडारा शहरातील कालबाह्य झालेली जलवाहिनी या समस्येत भर घालत आहे. यावर पालिका प्रशासनाने वेळेपूर्वीच ठोस पावले उचलावीत अशी मागणी भंडारेकर करीत आहेत. (प्रतिनिधी)