विक्रेत्यांकडून फळांवर रासायनिक प्रक्रिया
By Admin | Updated: May 14, 2015 00:29 IST2015-05-14T00:29:17+5:302015-05-14T00:29:17+5:30
इतर पिकांच्या तुलनेत फळ पिकांना जादा दर मिळत असल्याने सध्या बहुतांश शेतकऱ्यांनी फळ उत्पादनाला पसंती दिली ...

विक्रेत्यांकडून फळांवर रासायनिक प्रक्रिया
आरोग्यास धोका : शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांना दुप्पट फायदा, विशिष्ट गॅसचा वापर
भंडारा : इतर पिकांच्या तुलनेत फळ पिकांना जादा दर मिळत असल्याने सध्या बहुतांश शेतकऱ्यांनी फळ उत्पादनाला पसंती दिली आहे. मात्र, दर वाढल्यास कच्ची फळे खरेदी करून व्यापारी रासायनिक पद्धतीने ती पिकवून बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणत आहेत. रासायनिक प्रक्रियेद्वारे पिकवलेली अशी फळे आरोग्यास हानीकारक ठरत आहेत.
शेतकरी केळीचे पीक बारमाही घेतात. काही हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे बागांचे नुकसान होऊन शेती तोट्यात जाते. मात्र, ज्याठिकाणी चांगले उत्पन्न निघाले आहे. तेथील केळीला चांगली मागणी असते. बाजारपेठेत आवक कमी झाल्यानंतर केळीला चांगला दर मिळतो. तसेच केळी एकाच वेळी पिकत नसल्याने बागेतील सर्वच घड एकावेळी काढता येत नाहीत.
आठ दिवसांच्या फरकाने केळीचे घड काढले जातात. मात्र, सध्या व्यापारी शेतामधील माल खरेदी करून एकाच वेळेस केळीचे संपूर्ण घड काढत आहेत. त्यानंतर घडावर रासायनिक प्रक्रिया करून केळी पिकवली जात आहे. परिणामी, केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या किती तरी पटीने अधिक व्यापाऱ्यांना फायदा होतो.
जागतिक बाजारपेठेत आंब्यालाही चांगली मागणी आहे. व्यापारी कच्चे आंबे खरेदी करून ज्वलनशील पावडरीचा वापर करून ती पिकवत आहेत.
नैसर्गिक पद्धतीने आंबे पिकण्यास जास्त कालावधी लागतो. हा कालावधी वाचविण्यासाठी आणि अल्प वेळात जास्त पैसे मिळण्यासाठी व्यापारी अशा पद्धतीची रासायनिक प्रक्रिया करतात. रासायनिक प्रक्रियेद्वारे पिकवलेल्या फळाची चव वेगळी असते. अशा फळाचा दुष्परिणाम लगेचच जाणवत नसला तरी भविष्यात त्याचा फटका शरीराला बसतो.
नैसर्गिकरीत्या पिकलेल्या केळी दिसायला उठावदार नसतात. सुरुवातीला हिरवट पिवळा रंग असतो. त्यानंतर हळूहळू केळीवर काळे डाग पडत जातात. मात्र, रासायनिक प्रक्रिया करून पिकविलेली केळीला उठावदार भडक पिवळा रंग असतो. केळीच्या आतील गाभ्याला काळे डागे असतात. (शहर प्रतिनिधी)