रुग्णालयातील कारभार चव्हाट्यावर
By Admin | Updated: May 9, 2015 00:45 IST2015-05-09T00:45:29+5:302015-05-09T00:45:29+5:30
येथील ग्रामीण रुग्णालयातील अव्यवस्थेमुळे रुग्णांची गैरसोय नित्याची बाब आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनियमितता, ...

रुग्णालयातील कारभार चव्हाट्यावर
आमदारांनी केली रुग्णालयाची पाहणी : प्रकरण अड्याळ येथील ग्रामीण रूग्णालयाचे
अड्याळ : येथील ग्रामीण रुग्णालयातील अव्यवस्थेमुळे रुग्णांची गैरसोय नित्याची बाब आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनियमितता, कर्मचाऱ्यांशी, रुग्णांशी किंवा रुग्णांच्या नातेवाईकांशी असमम्य वागणूक तसेच आकस्मिक सेवेलाही ग्रहण लागले आहे.
डॉक्टर हजर नाही तर काही रुग्णवाहिका उपलब्ध नाही. एकंदरीत वेळेवर एकही कामात नाही अशा एक ना अनेक समस्या लोकमतमध्ये प्रकाशित होताच आमदार अॅड. रामचंद्र अवसरे यांनी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन वैद्यकीय सेवेची माहिती घेतली. दरम्यान ड्युटीवर असलेले वैद्यकीय अधिकारी गैरहजर आढळल्याने संताप व्यक्त केला. यावेळी रुग्णांशी चर्चा करून त्यांनी समस्या जाणून घेतल्या.
मागील काही दिवसांपासून ग्रामीण रुग्णालयाचा कारभार रामभरोसे सुरू आहे. अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे कुणाचेही समस्यांकडे लक्ष नाही.
यामुळे उपचारासाठी आणलेल्या किंवा आलेल्या रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींचे याकडे लक्ष नसल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. समस्या आवासून उभ्या असताना रुग्णांची ओरड असूनही वैद्यकीय अधीक्षक याकडे लक्ष देण्याचे सौजन्य दाखवीत नसल्याचे रूग्णांनी सांगितले.
आरोग्य सेवा आजारी असल्याचा प्रत्यय अनेकांना आला. यासंबंधी तक्रारी आमदारांकडे देण्यात आल्या. या तक्रारीची तसेच वृत्तपत्रात प्रकाशित बातम्यांची दखल घेत आमदारांनी ग्रामीण रुग्णालयाला आकस्मिक भेट दिली. या भेटीत ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांची वेळ व मोबाईल नंबर बोर्डावर लिहिणे, ड्युटी हजेरी रजिस्टर तत्काळ बनविण्याचे आदेश दिले.
बायोमेट्रिक पद्धत नियमित ठेवण्यासह रुग्णालयातील लाईट, पाणी या समस्यांकडे लक्ष वेधले. रुग्णालयात अनियमितता दिसून येताच अधिकाऱ्यांची कानउघाडणी करून रुग्णांची गैरसोय टाळण्याचे निर्देश दिले. (वार्ताहर)