वरठी शहरातून भंडारा ते तुमसरकडे जाणारा राज्य मार्ग क्रमांक २७१ हा नागपूर, भंडारा, वरठी, मोहाडी, तुमसर, तसेच मध्य प्रदेशात जाण्याकरिता महत्त्वाचा मार्ग असून या मार्गावर भंडारा जिल्ह्यातील वरठी येथे सनफ्लॅग कारखाना तसेच गोंदिया जिल्ह्यात अदानी पॉवर प्लांट असे महत्त्वाचे प्रकल्प आहेत. त्या प्रकल्पाकरिता लागणारा कच्चा माल घेऊन येणाऱ्या जड-अवजड वाहनांची नेहमी वर्दळ असते. या मार्गाने जाणारी वाहतूक ही वरठी गावातील रेल्वे क्राॅसिंगमधून करणे शक्य होणार नाही. गावातील मोटारसायकल, छोटी वाहने व बसेस जास्त प्रमाणात आहेत, तसेच या मार्गावरील वाहतूक ही पूर्णपणे बंद करणे शक्य होणार नाही. याकरिता या मार्गाने येणारी जड-अवजड वाहतूक पुढीलप्रमाणे वळविण्यात येईल.
नागपूरकडून मोहाडी- तुमसरकडे जाणारी जड वाहने मौजा शहापूर-सातोना-नेरी-पाचगाव-वरठी-मोहाडी येथून पुढे तुमसर- गोंदियाकडे एकेरी वाहतूक (बस, छोटे ट्रक व लहान वाहनाकरिता) तसेच अदानी पॉवर प्लांटमध्ये जाणारी जड-अवजड वाहतूक ही नागपूर-मनसर-रामटेक-खापा मार्गे तिरोडाकडे जाईल.
साकोली, लाखनी, पवनी, अड्याळवरून भंडाराकडून मोहाडी तुमसरकडे जाणारी जड-अवजड वाहतूक भंडारा-खामतलाव-सातोना-खात-अरोली-घोटीटोकवरून कांद्री-जांब-खापा चौक येथून पुढे तुमसर- गोंदियाकडे जाईल. गोंदिया, तिरोडा अदानी प्लांट तुमसरकडून भंडारा नागपूरकडे जाणारी जड-अवजड वाहने खापा चौकातून जांब-कांद्री-रामटेक मार्गे भंडारा व नागपूरकडे जाईल.
गोंदिया- तिरोडाकडून भंडारा, नागपूरकडे जाणाऱ्या जड वाहनाकरिता एकेरी वाहतूक माडगी-रोहा-बेटाळा-कोथुर्णा-दाभा-भंडारा (फक्त बस, छोटे ट्रक व लहान वाहनाकरिता) तुमसर, मोहाडीकडून भंडाराकडे जाणारी वाहतूक खापा चौक-मोहाडी-कुसारी फाटा-रोहा-बेटाळा-कोथुर्णा-दाभा-भंडारा (फक्त बस, छोटे ट्रक व लहान वाहनाकरिता) नागपूर, भंडारा, वरठी, मोहाडी, तुमसरकडे जाणारी व येणारी एस.टी. बस, हलकी व छोटी वाहने भंडारा-वरठी गावातून रेल्वे क्रॉसिंगवरून भंडारा- तुमसरकडे वळविण्यात आली आहेत. नागरिकांनी परावर्तित मार्गाचा अवलंब करावे, असे आवाहन पोलीस विभागाद्वारे करण्यात आले आहे.