पाचवीच्या अभ्यासक्रमात बदल ; पालक संभ्रमात
By Admin | Updated: July 5, 2015 00:40 IST2015-07-05T00:40:05+5:302015-07-05T00:40:05+5:30
पाचवीच्या अभ्यासक्रमात यंदा झालेल्या बदलानंतर मराठी प्रथम, हिंदी द्वितीय, इंग्रजी तृतीय प्रथम हे विषय...

पाचवीच्या अभ्यासक्रमात बदल ; पालक संभ्रमात
पुस्तकांचे दोन भागात विभाजन : दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी नवा प्रयोग
भंडारा : पाचवीच्या अभ्यासक्रमात यंदा झालेल्या बदलानंतर मराठी प्रथम, हिंदी द्वितीय, इंग्रजी तृतीय प्रथम हे विषय आणि त्याचबरोबर परिसर अभ्यास भाग-१ व २ गणित, कार्यानुभव, कलाशिक्षण, शारिरीक शिक्षण हे विषय समाविष्ट आहेत.
पाचवीच्या अभ्यासक्रमात यापूर्वी मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, सामान्य विज्ञान, भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र, कार्यानुभव, कलाशिक्षण, शारीरिक शिक्षण विषय होते. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सन २०१५-१६ पाचवीच्या अभ्यासक्रमात बदल केला गेला आहे. त्यानुसार पाचवीसाठी पूर्वीचे सामान्य विज्ञान, नागरिकशास्त्र व भूगोल या विषयाची एकत्रित परिसर अभ्यास भाग-१ मध्ये एकाच रितीने मांडणी करण्यात आलेली आहे.
इतिहास व भूगोल हे विषय भाग २ मध्ये एकत्रित केले आहेत. अर्थात पाच विषयांच्या पुस्तकांतील अभ्यासक्रम परिसर अभ्यासक्रम या विषयाच्या दोन टप्प्यात सामावून घेतल्याने विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे निश्चितच कमी झाले आहे. त्यामुळे या निर्णयाचे पालकांकडून स्वागत होत आहे.
विद्यार्थ्यांच्या दफ्तराचे ओझे कमी करण्याच्या दृष्टीने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून २०१५-१६ काही अभ्यासक्रमातच बदल झाला आहे.
त्यानुसार पाचवीच्या चार विषयांना परिसर अभ्यासक्रमात दोन भाग सामावून घेतले असून सेमी इंग्रजी माध्यमातील विज्ञान विषय मराठीतून शिकविले जाणार आहे. त्यामुळे पालकांत संभ्रम निर्माण झाला आहे. राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २०१२ नुसार शिक्षण विभागातर्फे अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाकडून एनसीआरटीईच्या शैक्षणिक प्राधिकरणाकडून आलेल्या मार्गदर्शनानुसार विषयांचा समतोल राखण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार अभ्यासक्रमातील बदल दोन वर्षांपासून करणे सुरू झाले आहे. (प्रतिनिधी)
पालकांमध्ये जागृतीची गरज
यंदापासून बदललेल्या पाचवीच्या अभ्यासक्रमात सेमी इंग्रजी माध्यमातील विज्ञान विषय मराठीतून शिकविला जाणार आहे. दहावीनंतर गणित व विज्ञान हे विषय संपूर्णपणे इंग्रजीतून असल्याने ते सेमी इंग्रजी माध्यमातून व्हावेत, असा पालकांचा आग्रह असताना विज्ञान विषय मराठीतून देण्यात आल्याने पालक संभ्रमात आहेत.
शाळांमध्ये प्रवेशासाठी गेल्यानंतर हा गोंधळ उडत आहे. मात्र सहावीत सामान्य विज्ञान हा विषय स्वतंत्र राहणार असल्याने शिक्षण विभागातून सांगण्यात आले. लोकमत विशेष प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २०१२ नुसार यंदा पाचवीच्या अभ्यासक्रमात बदल झाला आहे. विज्ञान, भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र हे विषय परिसर अभ्यासक्रम १ व २ मध्ये सामावून घेतले आहेत. यानुसार पुढील वर्षी सहावीच्या अभ्यासक्रमात बदल होईल. पाचवीच्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार सेमी इंग्रजी माध्यमासाठी परिसर अभ्यास भाग १ मधील सामान्य विज्ञान हा विषय इंग्रजीत तसेच भूगोल व नागरिकशास्त्र हे विषय मराठीतून शिकविणार आहेत.
पहिली, दुसरीचा परिसर अभ्यासक्रम बंद
शिक्षण विभागाचा सुधारित विषय रचनेनुसार प्राथमिक स्तरातील पहिली व दुसरीसाठी भाषा व गणित हे विषय ठेवले आहेत. मात्र या दोन्ही वर्गांसाठी परिसर अभ्यास हा स्वतंत्र विषय ठेवलेला नाही. भाषा व गणित या विषयामध्ये परिसर अभ्यासाचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय इंग्रजी विषय अनिवार्य असेल आणि शारीरिक शिक्षण, कला शिक्षण, कार्यानुभव हे विषयही राहणार आहेत.
अभ्यासक्रमात बदल करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांचे दफ्तरांचे ओझे कमी करण्यासोबतच सर्वांगीण बुद्धी कौशल्यावर भर देण्यात येत आहे. पालकांना संभ्रमता होणार नाही याची काळजी घेण्यात येईल.
- एकनाथ मडावी,
शिक्षणाधिकारी (प्राथमिक),
जिल्हा परिषद, भंडारा.