आठवडाभरात धानाची संपूर्ण खरेदी करण्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:23 IST2021-07-08T04:23:54+5:302021-07-08T04:23:54+5:30
लाखांदूर : अपुरे गोदाम आणि अनियमित बारदाण्याअभावी तालुक्यात रखडलेली धान खरेदी आठवडाभरात पूर्ण करण्याचे मोठे आव्हान पणन महासंघापुढे असून ...

आठवडाभरात धानाची संपूर्ण खरेदी करण्याचे आव्हान
लाखांदूर : अपुरे गोदाम आणि अनियमित बारदाण्याअभावी तालुक्यात रखडलेली धान खरेदी आठवडाभरात पूर्ण करण्याचे मोठे आव्हान पणन महासंघापुढे असून पावसळा सुरू झाला तरी धान खरेदीचे घोंगडे भिजत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
तालुक्यात ३० जूनपर्यंत केवळ ३२ टक्केच उन्हाळी धानाची खरेदी झाली होती. उर्वरित ७० टक्के धानाची खरेदी शिल्लक होती. शासनाने धान खरेदी कालावधीत १५ जुलैपर्यंत वाढ करून दिली आहे. मात्र, संबंधित विभागात अंतर्गत धान खरेदी केंद्रांना बारदाण्याचा पुरवठा केला नसल्याने येत्या आठ दिवसांत तालुक्यातील केंद्र चालकांना उर्वरित ७० टक्के धानाच्या खरेदी अंतर्गत लाखो क्विंटल धान्याच्या खरेदीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. यंदाच्या रब्बी हंगामात उन्हाळी धान खरेदीकरिता तालुक्यात १६ शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली होती. तालुक्यातील खरेदी केंद्राअंतर्गत गोदामांची असुविधा व बारदाण्याच्या अनियमित पुरवठ्याने केवळ १ लाख ६० हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. अद्याप तालुक्यातील ७० टक्के धानाची खरेदी शिल्लक आहे.
बॉक्स :
केंद्र चालकांसह शेतकऱ्यांत संभ्रम
यंदाच्या रब्बी हंगामाअंतर्गत उन्हाळी धान खरेदी करण्यासाठी तालुक्यात १६ आधारभूत धान खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली होती. केंद्र शासनाने १ जुलै रोजी निर्गमित केलेल्या पत्रान्वये ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र, जिल्हा पणन विभागाने ५ जुलै रोजी निर्गमित पत्रान्वये मुदतवाढ केवळ १५ जुलैपर्यंत दिल्याने शेतकऱ्यांसह केंद्र चालकांत धान खरेदीबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानुसार तालुक्यातील उर्वरित धानाची खरेदी आता आठ दिवसांत करावयाची आहे. मात्र, बारदाण्याचा पुरवठा झाला नसल्याने संपूर्ण धान खरेदी कशी होणार असा सवाल आहे.