उमेदवारांच्या नजरा नगराध्यक्षांच्या खुर्चीकडे
By Admin | Updated: October 21, 2015 00:44 IST2015-10-21T00:44:24+5:302015-10-21T00:44:24+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीनंतर नगरपंचायतीच्या निवडणुकींचा ज्वर चढला आहे.

उमेदवारांच्या नजरा नगराध्यक्षांच्या खुर्चीकडे
चंदन मोटघरे ल्ल लाखनी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीनंतर नगरपंचायतीच्या निवडणुकींचा ज्वर चढला आहे. नगरपंचायतच्या निवडणुकींच्या चर्चा पुर्ण तालुक्यात आहेत. चारही राजकीय पक्षांनी मोर्चेबांधनी केली आहे. १७ प्रभागातील १७ उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत.
स्थानिक नगरपंचायतमध्ये १० हजार २९४ मतदार मतदान करणार आहेत. यात ५१३१ पुरूष मतदार आहेत तर ५१६३ स्त्री मतदार आहेत. १७ प्रभागातील मतदार संख्या मर्यादित आहे. नगरपंचायत नगराध्यक्षाचे आरक्षण अद्यापही निघाले नाही. यामुळे लाखनी नगरपंचायतचा पहिला नगराध्यक्ष बनण्यासाठी अनेकांनी निवडणूक रिंगणात उडी मारली आहे. यात जुने जानते लाखनी ग्रामपंचायतचे अनुभवी राजकारणी आहेत. पंचायत समिती व जिल्हा परिषदांचे माजी सदस्य उमेदवारांच्या यादीत आहेत.
नगरपंचायत निवडणुकात मोठ्या प्रमाणात राजकीय चढाओढ आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकात काँग्रेसने यश संपादन केले. त्यामुळे आता नगरपंचायत काँग्रेसच्या ताब्यात कशाप्रकारे येईल याकरीता प्रत्येक प्रभागात दमदार उमेदवारांची निवड माजी आमदार सेवक वाघाये, नवनियुक्त तालुका अध्यक्ष सुनिल गिऱ्हेपुंजे यांनी केली आहे. लाखनीशहर म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नगरी जुना जनसंघ व सद्याचा भाजपाचा बालेकिल्ला आहे. खासदार नाना पटोले, आ. बाळा काशिवार यांनी लाखनी नगरपंचायत उमेदवार निवडीचे सुत्र माजी जि.प. सदस्य भरत खंडाईत यांच्याकडे सोपविली.
भाजपाची व छावा संघटनेची दमदार कार्यकर्त्यांची फळी तयार झाली आहे. लाखनी नगरपंचायत ताब्यात घेण्यासाठी भाजपा आतुर झाली आहे.
लाखनी ग्रामपंचायत बरखास्त करून नगरपंचायतची घोषणा केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा तिरमोड झाला. लाखनी ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती. लाखनी ग्रामपंचायतीनंतर नगरपंचायतवर राकाँ झेंडा रोवला जावा यासाठी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष डॉ. विकास गभणे, सुरेश गायधनी, विनोद भुते यांच्या नेतृत्वात नरेश डहारे यांच्या मार्गदर्शनाखाली तुल्यबळ उमदेवार रिंगणात उतरविले आहे.
लाखनी नगरपंचायतमध्ये काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अशी तिहेरी लढत होणार आहे तरीसुद्धा शहरातील पाच वॉर्डात शिवसेना उमेदवार देणार आहे. शिवसेनेचे लवकुश निर्वाण यांनी लाखनीतील काही प्रभागात वजनदार उमेदवार दिले आहे. विकासाच्या मुद्यावरून लाखनी नगरपंचायत निवडणुक लढविली जाणार. डोअर टु डोअर प्रचार उमेदवारांचा सुरू झाला आहे. जे प्रभाग सर्वसाधारण व नामाप्रवर्गासाठी आहेत. त्याठिकाणी उमेदवारीवरून व निवडून येण्यासाठी स्पर्धा आहे. सद्यस्थितीत सर्वच उमेदवारांचे लक्ष्य केवळ नगराध्यक्षांची खुर्ची आहे.
नगरपंचयत पंचायत निवडणूक पार पाडण्यासाठी निवडणूक अधिकारी उपजिल्हाधिकारी विजय उरकुडे, सहायक निवडणूक अधिकारी डी.सी. बोंबर्डे, आचारसंहित नोडल अधिकारी एस.ए. घारगडे, नायब तहसिलदार अश्विनी जाधव, मंडळ अधिकारी गोटेफोडे, नामनिर्देशन व अर्जाची छाननी करण्यासाठी विस्तार अधिकारी श्रीकांत नागलवाडे, चकोले, पागोटे, धुर्वे, सुशिल घाटबांधे व इतर कर्मचाऱ्यांची फौज सज्ज आहे.