तंटामुक्त समिती अध्यक्षांचे स्नेहमीलन
By Admin | Updated: October 26, 2016 00:48 IST2016-10-26T00:48:10+5:302016-10-26T00:48:10+5:30
तालुक्यातील मुंडीपार येथे तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांचे स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

तंटामुक्त समिती अध्यक्षांचे स्नेहमीलन
मुंडीपार येथे कार्यक्रम : लोकसेवा समितीची स्थापना
तिरोडा : तालुक्यातील मुंडीपार येथे तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांचे स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी युवा लोक सेवा समितीची स्थापना करण्यात आली. जि.प. सदस्यांनी गावात अभ्यास केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
मुंडीपार येथे प्रथमच महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्यावतीने आणि गावाच्या सहकार्याने सभामंडपात (शारदा मंदिरात) स्नेहमिलन कार्यक्रम घेण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी आ. दिलीप बन्सोड, उद्घाटक म्हणून जि.प. सदस्य मनोज डोंगरे, अतिथी म्हणून ठाणेदार संदीप कोळी, उपनिरीक्षक स्वप्नील उजवने, देवेंद्र चौधरी उपस्थित होते. यावेळी सरपंच शिला साठवणे, बेलाटी सरपंच स्वाती चौधरी, सरपंच वासूदेव हरिणखेडे, सदस्य माया पटले, घनश्याम चौधरी, धनलाल रहांगडाले उपस्थित होते.
स्नेहमिलन कार्यक्रमाच्या प्रारंभी तंमुसचे निर्माते माजी गृहमंत्री दिवंगत आर.आर.पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
तंमुसचे महत्व आणि गृहमंत्र्याची संकल्पना यावर ठाणेदार संदीप कोळी, जि.प. सदस्य मनोज डोंगरे, आणि माजी आ. दिलीप बन्सोड यांनी मार्गदर्शन केले. तंमुसमुळे पोलिसांकडे येणाऱ्या तक्रारीत घट झाली असून पोलिसांचा अनावश्यक कामात जाणारा वेळ वाचला. त्यामुळे अन्य कामे करण्यास तंमुसचे मोलाचे मार्गदर्शन लाभत असल्याचे ठाणेदार संदीप कोळी यांनी सांगितले. जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांनी मुंडीपार गावातील शांतता आणि उत्साहाची प्रशंसा केली. यावेळी गावांमध्ये अभ्यास केंद्र स्थापन करण्याकरिता आपण पुढाकार घेणार असल्याचे धाडस दाखविले. गावच्या उत्साहाबद्दल आयोजकांची प्रशंसा केली.
तंमुसमुळे गावच्या जनतेचा वेळ आणि पैशांची बचत झाली. गावात शांततेचे वातावरण दिसून येत असल्याचे सांगितले. गावात सलोख्याने व ऐक्याने राहून विकासाच्या बाबीकडे युवकांनी लक्ष घालावे. वाद निष्पक्षतेने सोडविण्याचा प्रयत्न करावा असाही सल्ला यावेळी बन्सोड यांनी यावेळी दिला. (प्रतिनिधी)
युवा लोक सेवा समिती
स्रेह मेळाव्याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत गाव स्तरावर युवा लोकसेवा समितीची स्थापना करण्यात आली. यात समितीद्वारे गावातील ज्या लोकांच्या घरी पुढाकार घेणारे नसतील व आरोग्य सेवेचा लाभ देत्यावेळी ही समिती सहयोग करणार आहे. गाव स्तरावरील व शासकीय सेवेसंबंधी गावातील नागरिकांच्या समस्या दुर करण्याचा प्रयत्न समिती करणार असल्याचे सांगितले. युवा लोक सेवा समिती, विविध कार्यक्रमासंबंधी आपली उपस्थिती दर्शवून सहकार्य करणार आहे.