लाखांदूर तालुक्यातील सोनी येथे १५ सप्टेबर १९१३ रोजी शाळेसाठी कौलारु वास्तू साकारण्यात आली. तत्कालीन कोर्ट ऑफ वाॅर्ड सिनियर भोसला इस्टेट नागपूर मालगुजारी सोनी यांनी शाळेसाठी जागा दान दिली होती. त्यावेळची या जागेची किंमत ५० रुपये होती. दान दिलेल्या जागेवर प्राथमिक शाळा बांधण्यात आली. त्यावेळी लगतच्या जिल्ह्यांसह गावच्या परिसरातील हजारो विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरविण्यासाठी येत होते. इमारतीच्या भिंतीवर आजही सुविचार, भारतीय संविधानाची प्रास्ताविका, भंडारा जिल्ह्याचा तालुकानिहाय नकाशा, राष्ट्रगीत, राष्ट्रीयगीत, प्रतिज्ञा, भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान यांचा कार्यकाल तथा त्यांच्या नावाची यादी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा नकाशा, शिष्यवृत्तीधारकधारक विद्यार्थ्यांची यादी यांची फलके रेखाटली आहेत. सध्यातरी या इमारतीच्या भिंती सुस्थितीत असून या भागात वानरांच्या वावराने छतावरील कवेलू दरवर्षी फुटतात. काही प्रमाणात छताचे लाकूड देखील कमकुवत झाले आहे. शाळा प्रशासनातर्फे नियमितपणे शाळेच्या इमारतीची निगा राखली जात आहे. चार पिढ्यांपासून हजारो विद्यार्थी घडल्याने इमारत जमीनदोस्त होऊ नये यासाठी प्रयत्न होण्याची आज गरज आहे.
बॉक्स
अधिकारी, राजकारणी अन् उत्कृष्ट नागरिक घडले
लाखांदूर तालुक्यातील शेवटचे गाव म्हणजे सोनी. गडचिरोली, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर आहे. चुलबंद व वैनगंगा नदीचा संगम देखील आहे. पूर्वीच्या काळी या लगतच्या तीन जिल्ह्यातील विद्यार्थी या शाळेत शिक्षणाचे धडे गिरवीत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. या शाळेतून शेकडो अधिकारी, राजकारणी व उत्कृष्ट नागरिक घडले आहेत. आजही येथील मुख्याध्यापक महारुद्र केंद्रे यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात सहकारी शिक्षक विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसह कलात्मक गुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहेत.