‘डीजे’मुक्त गणेशोत्सव साजरा करा
By Admin | Updated: August 31, 2016 00:29 IST2016-08-31T00:29:02+5:302016-08-31T00:29:02+5:30
येणाऱ्या सणानिमित्त जिल्ह्यात शांतता राखण्यास पोलीस प्रशासन सज्ज आहे.

‘डीजे’मुक्त गणेशोत्सव साजरा करा
विनिता साहू यांचे प्रतिपादन : मद्यपींवर राहणार नजर, जातीय सलोखा समितीची बैठक
भंडारा : येणाऱ्या सणानिमित्त जिल्ह्यात शांतता राखण्यास पोलीस प्रशासन सज्ज आहे. सर्व समान कार्यकर्ते व शांतता समितीच्या अध्यक्षांनी आपापल्या परीने शांतता ठेवावी. आगामी गणेशोत्सव डीजेमुक्त साजरा करावा असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केले.
भंडारा जिल्हा पोलीस मुख्यालयातील बहुउद्देशिय सभागृहात पार पडलेल्या जिल्हास्तरीय जातीय सलोखा समितीच्या बैठकीदरम्यान त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपविभागीय अधिकारी डॉ.संपत खिल्लारी, उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले, उपविभागीय पोलीस अधिकारी संख्ये, पोलीस उपअधीक्षक (गृह) धात्रक, पोलीस निरीक्षक कोरवाडकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी साहू यांनी जिल्ह्यात जिथे कुठे काही गुन्हे घडताना दिसत असेल तर त्याची त्वरीत माहिती सिटीझन अॅप व प्रतिसाद अॅप किंवा पोलीस नियंत्रण कक्षाच्या टोल फ्री क्रमांकावर सांगावे. घरातील व शेजारील महिलांना सुद्धा डिजीटल अॅप व प्रतिसाद अॅपची माहिती द्यावी. उत्सवादरम्यान बॅनर लावताना जे बॅनर सण उत्सव झाल्यानंतर काढत नाही ते काढावे, बॅनरवर प्रिंटरचे नाव व परवानगी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या या गणेशोत्सवाला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त बेटी बचाव, बेटी पढाव यानिमित्त जिल्हास्तरीय पुरस्कार ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगतानाच उत्सवा दरम्यान मद्यप्राशन करून धिंगाना घालणाऱ्या व्यक्तींवर पोलीस प्रशासन करडी नजर ठेवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी येणाऱ्या उत्सवांमध्ये सर्वांनी सामंजस्य साधून कार्य करावे प्रत्येक गावात एक गाव एक गणपती, एक वॉर्ड एक गणपती अशी संकल्पना आखल्यास कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन होणार नसल्याचे प्रतिपादन केले. यावेळी तंटामुक्त समिती अध्यक्ष, पोलीस पाटील, जातीय समिती सलोखा सदस्य, दक्षता समिती सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य व विविध विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.
संचालन स्थानिक गुन्हे विभागाचे कोलवाडकर यांनी केले तर आभार उपविभागीय अधिकारी सख्ये यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)