सीसीटीव्हीच झाले ‘नजरे’आड

By Admin | Updated: March 2, 2017 00:19 IST2017-03-02T00:19:46+5:302017-03-02T00:19:46+5:30

सुमारे पाच वर्षाआधी महात्म गांधी तंटामुक्त ग्राम समितीने मिळालेल्या पुरस्कार निधीअंतर्गत गावात विविध सामाजिक उपक्रम राबविले होते.

CCTV has happened 'Nazarate' | सीसीटीव्हीच झाले ‘नजरे’आड

सीसीटीव्हीच झाले ‘नजरे’आड

अडगळीत धूळखात पडले : अड्याळ ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाला पडला विसर
विशाल रणदिवे अड्याळ
सुमारे पाच वर्षाआधी महात्म गांधी तंटामुक्त ग्राम समितीने मिळालेल्या पुरस्कार निधीअंतर्गत गावात विविध सामाजिक उपक्रम राबविले होते. त्यात बसस्थानकावर नागरिकांच्या सुरक्षेसाठी व पोलीस प्रशानाच्या दक्षतेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. वर्षभरापूर्वी बसस्थानक तसेच तेथील अतिक्रमण हटले आणी त्याच दिवशी ते दोन कॅमेरेही हटले. तेव्हापासून ते आजपर्यंत पुन्हा ते कुणालाही दिसलेच नाही. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी असलेल्या कॅमेरा लावण्यावर कोणाची ‘नजर’ पोहचेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महत्वाचे म्हणजे ते कॅमेरे आहेत कुठे? त्यावेळी कोणी काढले होते? आणि असतील तर आजपावेतो लागले का नाही? असा प्रश्न यावेळी ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.
पवनी तालुक्यातील भंडारा ते चंद्रपूर या राज्य महामार्गावर वसलेल्या व जवळपास २० हजार लोकसंख्या असलेल्या अड्याळ बस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा पहिला मान व महाराष्ट्रात एकमेव स्तुत्य उपक्रम ठरला असल्याचा दावा तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी या सिसिटीव्ही कॅमेरा उद्घाटनप्रसंगी केला होता.
तत्कालीन ठाणेदार प्रदिप सिरस्कर यांनी याकडे गांभीर्याने लक्ष ठेवले होते. कारण पोलीस स्टेशन मध्येच त्याचे रिमोट होते. यामुळे पोलिसांचे २४ तास लक्ष असायचे. यामुळे बसस्थानक परिसरात कोण कुठून येतो कुठे जातो. अप्रिय घटना घडलीच तर तात्काळ पोलीस यंत्रणा यायची अशी मोलाची मदत व्हायची.
तत्कालीन ठाणेदार गेल्यानंतर डी. एम. गोंदळे त्यानंतर अजबराव नेवारे हे ठाणेदार म्हणून आले. पंरतु या विषयाला गंभीरतेने कुणी घेतलेच नाही. कारण गंभीरतेने घेतले असते तर कॅमेरे केव्हाचेच सुरु झाले असते.
लावण्यात आलेले कॅमेरे दुरुस्त करण्याची जबाबदारी कोणाची असणार? ग्रामपंचायत की पोलीस प्रशासनाची? ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या हिताची राहू शकते. परंतु पोलीस प्रशासन ग्रामस्थांची सुरक्षा ही करते. मग बंद अवस्थ्ेत असणारे धुळखात पडलेले कॅमेरे लावणार कोण? पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून हे कॅमेरे कामात येतात पण याची जाणीव ठाणेदार अजबराव नेवारे यांना लवकर जर आली तर ग्रामस्थ व प्रवासी दोघांचीही सुरक्षा रामभरोसे न राहता त्यांचा फायदा पोलिसांनाही होईल यात काही शंका नाही. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या स्तुत्य उपक्रमामुळे येथील ठाणेदार व ग्रामस्थांचे कौतुक केले होते. आणि याचा सर्वाधिक लाभ पोलिसांनाच होणार म्हणून पोलीस स्टेशन मध्येच थेट प्रक्षेपन दिसत होते. मग जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. विनिता साहु व येथील ठाणेदार अजबराव नेवारे यांना याचा फायदा होणार नाही का? काढुन ठेवलेले कॅमेरे नेमके कुणाकडे आहेत याचा जेव्हा शोध घेण्यात आला, तेव्हा ग्रामपंचायत मधील त्यांचे साहित्य ठेवण्याच्या खोलीत ते धुळखात पडलेल्या स्थितीत आढळले. याविषयी मागील अनेक दिवसांपासून काढून ठेवलेल्या कॅमेराचा शोध घेणे सुरू होता. कॅमेरे लावणे म्हणजे श्रेय लाटण्याचा कार्यक्रम नसुन एक सामाजिक व सुरक्षेच्या दृष्टीने अती महत्वाची बाब असल्याची प्रतिक्रिया अतुल मुलकलवार यांनी व्यक्त केले. राजू रोहणकर, कमलेश जाधव, निरंजन देवईकर, प्रकाश मानापुरे यांनी कॅमेरा लावण्याची मागणी केली.

सीसीटीव्ही कॅमेरामुळे पोलीस प्रशासनाला मदत आणि ग्रामस्थ व प्रवाशांच्या सुरक्षेच्या हेतुने हा उपक्रम राबविण्यात आला होता. पंरतु या संचाची देखभाल वेळेवर न झाल्याने बंद आहेत. हे संच त्वरित सुरु होणे ग्रामस्थ तसेच पोलीस प्रशासन दोघांचाही फायदा आहे.
-रामकृष्ण कुर्झेकर, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष
अंदाजे १०,४०० रुपयांचा दुरुस्ती अंदाजपत्रक आला होत्क़ परंतु मध्येच बसस्थानक परिसरात अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे तो विषय राहिला. समोर येणाऱ्या मासीक सभेत ठराव घेवून कॅमेरे लावण्यात येईल. याचा रिमोट कंट्रोल पोलीस स्टेशन येथेच देण्यात येईल.
-एस ए. नागदेवे, ग्रामविकास अधिकारी, अड्याळ
हे बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे ग्रामपंचायतने सुरु करावे. त्यासाठी जी काही मदत लागेल त्यात आम्ही सहकार्य करु. कॅमेरे गावाच्या सुरक्षेसाठी महत्वाचे आहेत.
-अजबराव नेवारे, ठाणेदार, पोलीस स्टेशन अड्याळ

Web Title: CCTV has happened 'Nazarate'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.