भंडारा शहरात लागणार सीसीटीव्ही कॅमेरे

By Admin | Updated: November 15, 2014 01:16 IST2014-11-15T01:16:33+5:302014-11-15T01:16:33+5:30

शहरी विकास योजना, वैशिष्ट्यपूर्ण योजना, तेरावा वित्त आयोग, मागासवर्गीय विकास योजना आणि सुजल निर्मल योजनेतून शहराच्या...

CCTV cameras to be used in Bhandara city | भंडारा शहरात लागणार सीसीटीव्ही कॅमेरे

भंडारा शहरात लागणार सीसीटीव्ही कॅमेरे

भंडारा : शहरी विकास योजना, वैशिष्ट्यपूर्ण योजना, तेरावा वित्त आयोग, मागासवर्गीय विकास योजना आणि सुजल निर्मल योजनेतून शहराच्या विकासासाठी पुढाकार घेण्यात आला असून शहरातील सर्वच सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष बाबुराव बागडे यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
यावेळी ते म्हणाले, शहरी विकास योजनेतून लायब्ररी चौक ते जिल्हाधिकारी चौक या मार्गाच्या डांबरीकरणासाठी २.७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हे काम लवकरच सुरू होणार आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून शहरातील राजीव गांधी चौक, मिस्कीन टँक चौक, हुतात्मा चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे.
स्मशानभूमी परिसरात पाण्याची टाकी आणि त्या मार्गाकडे जाण्यासाठी पक्क्या रस्त्याचे बांधकाम करणे, पालिकेच्या जागेवर व्यापारी संकुल बांधण्यात येणार आहे. हे व्यापारी गाळे लायब्ररी चौकात असलेल्या बजाज कॉम्पलेक्सवर पहिला मजला बांधण्यात येणार आहे. जुने गांधी विद्यालय परिसरात अतिक्रमण वाढत असून याठिकाणी व्यापारी संकुल उभारण्यात येणार असून त्याचे डिझाईन लवकरच मिळणार आहे.
तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून शहरातील सफाईसाठी ७० कंटेनर मागविण्यात आले आहेत. अन्य योजनांमधून शहरात शहर स्वच्छ अभियान राबविणे, बाजाराचे स्थानांतरण करणे, नागरिकांच्या सुरक्षिततेकरीता शहरात वाहतूक सिग्नल लावण्यात येईल. पालिकेच्या मंजूर शहर विकास योजनेमध्ये हद्द दर्शविणाऱ्या सीमेवर नगर परिषद आपले स्वागत करीत आहे, असे प्रवेशद्वार आणि शहरात ठिकठिकाणी क्षेत्र दर्शविणारे फलक लावण्यात येणार आहेत. याशिवाय शहराचा विकास आराखडा आखण्यात आले असून त्याचा प्लॅन लवकरच मिळणार असल्याचे बागडे यांनी सांगितले. पत्रपरिषदेला उपाध्यक्ष कविता भोंगाडे, नगरसेवक महेंद्र गडकरी, विनयमोहन पशिने, महेंद्र निंबार्ते उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: CCTV cameras to be used in Bhandara city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.