सांस्कृतिक कार्यक्रमात धिंगाणा घालणाऱ्यास अटक
By Admin | Updated: November 26, 2015 00:34 IST2015-11-26T00:34:55+5:302015-11-26T00:34:55+5:30
मंडई उत्साहादरम्यान आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात दारु ढोसून धिंगाणा घालणाऱ्या एकाला शांत करायला गेलेल्या पोलिसांना त्याने धक्काबुक्की केली.

सांस्कृतिक कार्यक्रमात धिंगाणा घालणाऱ्यास अटक
शिवणीतील घटना : पोलिसांशी हुज्जत
तुमसर : मंडई उत्साहादरम्यान आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात दारु ढोसून धिंगाणा घालणाऱ्या एकाला शांत करायला गेलेल्या पोलिसांना त्याने धक्काबुक्की केली. त्यानंतर चांगला चोप देऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आले. ही घटना सोमवारी रात्री १० वाजता शिवणी येथील मंडई उत्सवादरम्यान घडली.
गोपाल उर्फ प्रशांत हरिश्चंद्र हटवार (२६) रा.गांधी वॉर्ड तुमसर असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे.
तुमसर शहरालगतच्या शिवणी गावात सोमवारी मंडई उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गावातून कामाकरिता बाहेर गेलेले लोक त्यादिवशी एकत्र येऊन सर्वांच्या गाठीभेटी घेतात. मंडईत बाहेरून स्वगावी परतलेल्या लोकांच्या व पाहुण्यांचे मनोरंजन व्हावे या करिता शिवणी गावात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान कार्यक्रमाला उशिर झाल्याने आता कार्यक्रम बंद करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगताच यथेच्छ दारू ढोसून आलेला गोपाल हा मंचावर चढून कार्यक्रम बंद होणार नाही, असे म्हणत आयोजकांनाच शिवीगाळी करु लागला. आयोजकांनी पोलिसांना पाचारण केले. पोलीस घटनास्थळी पोहोचून गोपालची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र तो उलट पोलिसांनाच शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याने पोलिसांनी त्याला चांगलेच बदडले. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध भादंवि १५१ कलमान्वये कारवाई करुन अटक केली. (शहर प्रतिनिधी)