१० महिन्यांपासून पाणलोट समितीचा घोळ
By Admin | Updated: November 4, 2014 22:35 IST2014-11-04T22:35:22+5:302014-11-04T22:35:22+5:30
तालुक्यातील ग्रामपंचायत मोहाडी खापा येथे अवैधरीत्या पाणलोट समिती स्थापन केल्याचा निर्वाळा खुद्द खंडविकास अधिकाऱ्यांनी दिला होता. येथील ग्रामसेवकाने कागदावर नियमबाह्यपणे पाणलोट

१० महिन्यांपासून पाणलोट समितीचा घोळ
तुमसर : तालुक्यातील ग्रामपंचायत मोहाडी खापा येथे अवैधरीत्या पाणलोट समिती स्थापन केल्याचा निर्वाळा खुद्द खंडविकास अधिकाऱ्यांनी दिला होता. येथील ग्रामसेवकाने कागदावर नियमबाह्यपणे पाणलोट समिती स्थापन केली. अशी तक्रार ११३ ग्रामस्थांनी खंडविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तीन महिन्यांपूर्वी केली होती. येत्या आठ दिवसात समिती स्थापन न केल्यास आंदोलनाचा इशारा तक्रारकर्त्यांनी दिला आहे.
मोहाडी खापा येथे दि. २६ जानेवारी २०१४ ला ग्रामसभेत पाणलोट समितीची स्थापना झाली नाही तरी प्रोसीडींगमध्ये समिती अध्यक्ष, सचिव व इतर सदस्यांची नावे लिहिण्यात आली. या संदर्भात १५ आॅगस्टला ग्रामस्थांनी पाणलोट समिती स्थापन झाली काय? असा प्रश्न ग्रामसेवकाला विचारला, तेव्हा समिती स्थापन झाली असे उत्तर ग्रामसेवकांनी दिले. प्रोसीडिंग बुकमध्ये ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच विमला कानतोडे व सचिव म्हणून मुख्याध्यापक बोपचे यांचे नाव नमूद आहे.
११३ ग्रामस्थांनी स्वाक्षरीनिशी खंडविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती. चौकशी केल्यावर पाणलोट समिती रद्द ठरविली. यात निवड प्रक्रिया करताना समितीचे सचिव निवडीसाठी गावातील अर्हताप्राप्त उमेदवारांचे अर्ज पाणलोट समितीकडे प्राप्त करून त्यातून सचिवाची निवड ग्रामसभेने करावयास पाहिजे होती. परंतु तशी प्रक्रिया ग्रामसभेत झाली नसल्याने पुन्हा ग्रामसभा घेऊन पाणलोट समितीची रचना करण्याचे आदेश सरपंच व सचिवांना दिले होते. परंतु कारवाई झाली नाही. आठ दिवसात समितीची नवीन रचना न केल्यास दिपक तुरकर, रंजीत बुद्धे, वामन बुद्धे, संतोष शरणागत, दिपक तुरकर, डिलेश शरणागत, विलास पटले यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तालुका कृषी अधिकारी गभणे यांना विचारले असता पाणलोट समितीही ही महत्वपूर्ण समिती असून या संदर्भात संबंधित ग्रामसेवकांशी संपर्क करून तात्काळ पाणलोट समिती स्थापन करण्याचे सांगणार असल्याचे सांगितले. ग्रामसेवक नागदेवे यांना या संदर्भात भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी भ्रमणध्वनी उचलला नाही. (तालुका प्रतिनिधी)