सहा सावकारांविरूद्ध गुन्हे दाखल
By Admin | Updated: December 13, 2015 00:32 IST2015-12-13T00:32:27+5:302015-12-13T00:32:27+5:30
कर्जदारांना नमुना आठच्या बनावट पावत्या देऊन त्यांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली सहा सावकारांविरुद्ध पवनी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सहा सावकारांविरूद्ध गुन्हे दाखल
पवनी येथील कारवाई : आणखी काही अवैध सावकार रडारवर
पवनी : कर्जदारांना नमुना आठच्या बनावट पावत्या देऊन त्यांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली सहा सावकारांविरुद्ध पवनी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पवनी व अड्याळ पोलीस ठाण्यात आणखी सात सावकार ंविरुद्ध तक्रारी आहेत.
या सावकारांनी कर्जदारांना महाराष्ट्र सावकारी अधिनियमामधील नमुना आठच्या बनावट पावत्या देऊन फसवणूक केली. या बनावट पावत्या या सावकारांनी अधिकृत म्हणून वापरले. या सावकारांनी यासंबंधी महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ कलम २४ अनुसार संबंधित रजिस्टरला नोंद न घेतल्याने शासनाचा महसूल बुडवून फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पवनी तालुका निबंधक प्रमोद हुमणे यांनी पवनी पोलीस ठाण्यात सहा सावकारांविरुद्ध तक्रार नोंदविली. या तक्रारीवरुन यशवंत भुरे रा.बाचेवाडी, शालू सावरबांधे व साक्षी लांबट रा.आसगाव या सावकारांविरुद्ध व देवानंद हाडगे, आशिष लांबट, श्यामसुंदर कलंत्री रा. पवनी या सावकारांविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४६८, ४७१ सहकलम २४, ४३ महाराष्ट्र सावकारी अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गदादे करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)