बदली प्रकरणात पैसे घेणाऱ्यांची लपाछपी सुरू

By Admin | Updated: April 28, 2017 00:34 IST2017-04-28T00:34:53+5:302017-04-28T00:34:53+5:30

भंडारा जिल्हा परिषदेने केलेल्या नियमबाह्य ११७ शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या रद्द झाल्या.

In the case of transfer, the lovers of money will continue to hide | बदली प्रकरणात पैसे घेणाऱ्यांची लपाछपी सुरू

बदली प्रकरणात पैसे घेणाऱ्यांची लपाछपी सुरू

प्रकरण ११७ शिक्षकांच्या बदली रद्दचे : जिल्हा परिषदेत धडकले शिक्षक
प्रशांत देसाई   भंडारा
भंडारा जिल्हा परिषदेने केलेल्या नियमबाह्य ११७ शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या रद्द झाल्या. या आशयाचे वृत्त गुरूवारला ‘लोकमत’ने प्रकाशित केले. यामुळे बदलीप्रक्रियेत दिलेले पैसे परत मागण्यासाठी यातील २५ ते ३० शिक्षक जिल्हा परिषदमध्ये धडकले. ज्यांनी पैसे घेतले, त्यांना पैसे परत करण्याची मागणी करण्यात आली. यामुळे पैसे घेऊन आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्यांनी मोबाईल बंद ठेवले तर, अनेकांनी शहरातून बाहेर जाणे पसंत केले.
शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत जिल्हा परिषद भंडाराच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी संगणमत करून आर्थिक व्यवहारातून या बदल्या केल्याचे स्पष्ट झाले. बदलीत प्रकरणात अनियमितता झाल्याने ११७ शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्यात येत असल्याचे आदेश विभागीय आयुक्त अनूपकुमार यांनी २१ एप्रिलला बजावले. जिल्हा परिषदने तातडीने आदेशाची अंमलबजावणी करून ३० एप्रिलपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. गुरूवारला ‘लोकमत’ने ‘११७ शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्या रद्द’ या आशयाचे वृत्त प्रकाशित झाले. हे वृत्त प्रकाशित होताच बदली प्रकरणात पैसे देणाऱ्यांपैकी २५ ते ३० शिक्षक आज जिल्हा परिषदमध्ये धडकले.
यात त्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांना गराडा घातला. या सर्व संतप्त शिक्षकांनी डोंगरे यांना बदली प्रकरणात झालेल्या अनियमितता व पैशाने फसगत झाल्याची हकिकत कथन केली. यावर डोंगरे यांनी त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केल्यानंतर शिक्षक परत गेलेत. मात्र, पैसे दिल्यानंतरही बदल्या रद्द झाल्याने शिक्षकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. यात शिक्षकांची आर्थिक फसगत झाली आहे. प्रक्रियेतील ‘दलाल’ यांना शिक्षकांनी भ्रमणध्वनी करून पैसे परत करण्याची मागणी केली. सुरूवातील या दलालांचे भ्रमणध्वनी सुरू होते. मात्र, शिक्षकांच्या त्रासाचा ससेमिरा वाढल्याने अनेकांनी भ्रमणध्वनी बंद करून ठेवले. तर अनेकांनी शहराबाहेर पळ काढला आहे.

बदली प्रकरणात मोठी उलाढाल
शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायक येवले व निलंबित कनिष्ठ सहायक बुरडे यांनी मोठी भूमिका निभावल्याची चर्चा आता समोर येऊ लागली आहे. यासोबतच या प्रक्रियेसाठी शिक्षणाधिकारी, सामान्य प्रशासन विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. या सर्वांवर आता संशयाची सुई आहे. दुसरीकडे बदल्या रद्द झाल्याने शिक्षकांनी पैसे परत मागण्याचा तगादा सुरू केल्याने अनेकांची नावे आता समोर येऊ लागली आहे. यात काही पदाधिकारी तर काहिंनी पदाधिकारी जवळचे असल्याचे बतावणी करून शिक्षकांकडून मोठी रक्कम उकळल्याचेही समोर आले आहे. बदली प्रकरणात कोट्यवधींची उलाढाल झाली याबाबत शंका नाही.

Web Title: In the case of transfer, the lovers of money will continue to hide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.