पीक विमाअभावी शेतकरी संकटात

By Admin | Updated: July 4, 2016 00:35 IST2016-07-04T00:35:01+5:302016-07-04T00:35:01+5:30

शेतकरी निसर्गाच्या कचाट्यात सुमार सापडला असताना त्याच्या मदतीकरिता शासन, प्रशासनही डोळेझाक करीत आहे.

In case of crop failure due to crop insurance | पीक विमाअभावी शेतकरी संकटात

पीक विमाअभावी शेतकरी संकटात

न्यायाची अपेक्षा : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
पालांदूर : शेतकरी निसर्गाच्या कचाट्यात सुमार सापडला असताना त्याच्या मदतीकरिता शासन, प्रशासनही डोळेझाक करीत आहे. संकटकालीन स्थितीत पिकविमा कामात यावा, याकरिता शेतकरी पिक कर्जासोबत विमा उतरवितो. यातून थोडीफार मदतीची अपेक्षा धरीत धैर्याने शेती कसतो. पालांदूर परिसरात सतत तीन वर्षापासून कोरडा, ओला दुष्काळ पडत आला आहे. २०१४-२०१५, २०१५-२०१६ या दोन वर्षात दुष्काळ पडत ५० पैशाच्या आत आणेवारी जाहीर करून जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ मिळाला. मात्र विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा पालांदूर येथील लाभार्थ्यांना पिकविमा मिळालाच नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटांचा सामना करीत आहे.
विमा कंपनी व विदर्भ ग्रामीण बँक यांच्यात समन्वय नसल्याने ग्राहकांना आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. २०१४-२०१५ चा पिकविमा लगेच सहा महिन्यात मिळणे अगत्याचे असल्याने आजही मिळाला नसल्याचे पत्रपरिषदेत नत्थू सीताराम खंडाईत रा. पालांदूर यांनी सांगितले. दोन वर्षात दुष्काळ पडून पिकविमा कंपनी विमा रक्कम द्यायला टाळाटाळ का करते हे अनुत्तरीत आहे. जिल्हा, तालुका, गाव एकच असताना पिकविमा मंजूर होऊनही न मिळणे म्हणजे लोकशाहीची कुचंबना करणे होय. वारंवार क्षेत्रीय व्यवस्थापक ग्रामीण बँक भंडारा यांच्याशी प्रत्यक्ष भेटूनही आश्वासनाच्या भोपळ्यापलिकडे हातात काहीही लागले नाही. पाहू, प्रयत्न सुरु असून वरिष्ठांकडे विषय वर्ग केला असून लवकरच विमारक्कम मिळण्याची आशा दाखवतात. परंतू कृती शून्य आहे.
प्रभावित शेतकरी विचारतो कर्ज घेतेवेळी शेतकऱ्याला तात्काळ व्याज सुरु होतो. मग आता २ वर्षापासून पिकविम्याची रक्मक मिळाली नसल्याने लाभार्थ्यांना त्या रकमेचा व्याज मिळेल काय? वर्षाच्या अनेक फेऱ्या क्षेत्रीय बँक भंडाऱ्याला माराव्या लागल्या. याचा खर्च मिळेल काय? वारंवार भ्रमणध्वनी वरून विषयाला हात घालून विचारणा करावी लागली याचा खर्च मिळेल काय? न मिळाल्यास ग्राहक मंचात धाव घ्यावी लागेल.आमचा लोकप्रतिनिधींनी व्यापारी झाल्याने निवडणुकीपुरताच आमचा आहे. 'रुपया लगाव रुपया कमाव' सूत्राने वागत असल्याने लोकप्रतिनिधींचा धाक, प्रशासनावर उरला नाही. याचा वाईट परिणाम समाजमनावर होऊन लोकप्रतिनिधीविषयी राग जोर करीत आहे. (वार्ताहर)

पिकविमा प्रकरण वरिष्ठस्तरावर गेलेला आहे. शाखास्तरावर येताच तात्काळ लाभार्थ्यांना वाटप करण्यात येईल. क्षेत्रीय स्तरावर प्रक्रियासुरु असून पुढील कार्यवाहीकडे लक्ष आहे. ग्राहक आमचेच असल्याने काळजी सुरु आहे.
- संजय सेलूकर
शाखा व्यवस्थापक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, पालांदूर (चौ.)

Web Title: In case of crop failure due to crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.