मालवाहू उलटून ४० महिला जखमी

By Admin | Updated: August 18, 2015 00:36 IST2015-08-18T00:36:25+5:302015-08-18T00:36:25+5:30

रोवणीसाठी मिनीडोरने महिला मजुरांना घेऊन जाणाऱ्या वाहन चालकाचे वाहनावरुन नियंत्रण सुटल्याने मिनीडोर उलटला.

Cargo recovered 40 women injured | मालवाहू उलटून ४० महिला जखमी

मालवाहू उलटून ४० महिला जखमी

भंडारा : रोवणीसाठी मिनीडोरने महिला मजुरांना घेऊन जाणाऱ्या वाहन चालकाचे वाहनावरुन नियंत्रण सुटल्याने मिनीडोर उलटला. या अपघातात ४० महिला जखमी झाल्या तर एक महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास लाखनी - भंडारा महामार्गावरील कन्हाळमोह वळणमार्गावर घडली. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहे.
प्रमिला पुरूषोत्तम टेकाम (५०) रा. गराडा असे मृत महिलेचे नाव आहे. या अपघातात मालवाहू वाहनातील सुमारे ४० महिला जखमी झाल्या आहेत. पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर रोवणीने वेग घेतला आहे. लाखनी तालुक्यातील गराडा (केसलवाडा) येथील ५० महिलांचा समुह रोवणीसाठी भंडारा तालुक्यातील डव्वा या गावाकडे प्रमोद गुरूनाथ मेश्राम रा.गराडा यांच्या एम.एच. ३२/ क्यू. ४६४० या वाहनात बसून जात होत्या. प्रवाशी वाहतूक करण्याचा परवाना नसतानाही मालवाहू वाहनात ५० महिलांना बसवून हा प्रवास सुरू होता.
शेतात लवकर पोहचायचे असल्यामुळे चालकाने वाहनाचा वेग वाढविला. दरम्यान लाखनी-भंडारा महामार्गावरील कन्हाळमोह उड्डाण पुलाजवळ वाहनावरुन चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो उलटला. वाहन उलटताच महिलांनी आरडाओरड केली. अपघाताचे गांभीर्य ओळखून परिसरातील नागरिकांनी त्यांना मदतीचा हात देऊन जखमींना धारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या अपघातातील गंभीर जखमींना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. वाहन उलटताच वाहनचालक मेश्राम याने घटनास्थळावरून पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच कारधा पोलीस अपघातस्थळी पोहोचले.
अपघातातील जखमींमध्ये निशा मेश्राम, माधुरी कांबळे, प्रगती जांभूळकर, रंजू नैताम, सविता उईके, ध्रुपता उईके, रेखा परतेकी, प्रेमसागर मरसकोल्हे, कुसुम वाडीवार, निशा भलावी, रत्नमाला खंगार, भारती मेश्राम, ज्योती मेश्राम, सुनंदा वरठे, अश्विनी वाडीवार, काजल टेकाम, ललीता शहारे, देवांगणा मेश्राम, पुष्पलता मारबते, महानंदा जांभुळकर, बबिता मेश्राम, कौशल्या जांभुळकर, देवीदास मेश्राम, दीक्षा शहारे, अर्चना टेकाम यांचा समावेश आहे. दरम्यान प्रमिला टेकाम यांचा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातप्रकरणी कारधा पोलिसांनी वाहनचालक प्रमोद मेश्राम रा.गराडा याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली.
दरम्यान या अपघातातील किरकोळ जखमींवर प्रथमोपचार करून त्यांना सुटी देण्यात आली. या सर्व जखमींना आकस्मिक रुग्णसेवा असलेल्या कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर डॉक्टरांची चमू उपचार करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)

मदतीला सरसावले शेकडो हात
अपघाताची माहिती होताच, जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर, समाजकल्याण सभापती ज्ञानेश्वर टेकाम, लाखनी पंचायत समितीच्या सभापती रजनी आत्राम, जिल्हा परिषद सदस्य प्यारेलाल वाघमारे, ज्ञानेश्वर रहांगडाले, प्रेमकुमार वनवे, वंदना पंधरे, डॉ. श्रीकांत भुसारी, रघुनाथ आत्राम यांनी मिळेल त्या वाहनाने जखमींना लगतच्या धारगाव प्राथमिक आरोग्य केंद्र व तेथून जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. एवढेच नव्हे तर, रूग्णालयात जखमींवर औषधोपचार होतपर्यंत ते उपस्थित होते. यानंतर दुपारी आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे आणि सकाळी माजी आमदार सेवक वाघाये यांनी सामान्य रूग्णालयात जावून जखमींची भेट घेतली.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दाखविली तत्परता
वाहन उलटून झालेल्या अपघातग्रस्तांना तातडीने औषधोपचार मिळावा यासाठी, त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. एरव्ही जिल्हा सामान्य रूग्णालय म्हटले की, नागरिकांना तिथे येणाऱ्या अडचणींना सामोरे जावे लागते. परंतू, या अपघाताचे गांभीर्य ओळखून जिल्हा शल्य चिकित्सक देवेंद्र पातूरकर, निवासी वैद्यकीय अधिकारी सुनिता बढे, वैद्यकीय अधिकारी नाईक यांच्यासह रूग्णालयातील सर्व कर्मचारी धावपळ करताना दिसून आले. डॉ. पातूरकर हे स्वत: रूग्णांवर औषधोपचार करून त्यांना बेड देण्यासाठी धडपडतांना दिसले.

Web Title: Cargo recovered 40 women injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.