चांदपूर तलावावर व्यापाऱ्याचा कब्जा

By Admin | Updated: May 21, 2017 00:16 IST2017-05-21T00:16:53+5:302017-05-21T00:16:53+5:30

चांदपूर परिसरातील ५ ते ७ गावे मिळून चांदपूर तलाव मासेमारीकरिता भाडे तत्वावर घेण्यात आले, ....

Capture of trader on Chandrapur lake | चांदपूर तलावावर व्यापाऱ्याचा कब्जा

चांदपूर तलावावर व्यापाऱ्याचा कब्जा

नियमांचे उल्लंघन : मत्स्य विभाग मूग गिळून गप्प
मोहर भोयर । लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : चांदपूर परिसरातील ५ ते ७ गावे मिळून चांदपूर तलाव मासेमारीकरिता भाडे तत्वावर घेण्यात आले, परंतु नियमानुसार सभासद गावातील मासेमार मासेमारी करण्याऐवजी नागपूरच्या व्यापाऱ्याने तलावावर कब्जा केल्याची धक्कादायक माहिती आहे. संबंधित मत्स्य संस्थेवर एका व्यक्तीची एकाधिकारशाही येथे सुरू आहे. मत्स्य विभाग येथे मुग गिळून आहे. सुमारे १५ ते २० वर्षापासून संबंधित मत्स्य सहकारी संस्थेकडेच हा तलाव भाडेतत्वावर दिला जातो, अशी माहिती आहे.
भंडारा जिल्ह्यातील चांदपूर हा क्रमांक दोनचा मोठा तलाव आहे. चांदपूर तलावात मासेमारी मोठ्या प्रमाणात केली जाते. विस्तीर्ण तलाव असून सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेद्वारे येथे पाणी उपसा केला जातो. भर उन्हाळ्यातही या तलावात पाणीसाठा उपलब्ध असतो. चांदपूर परिसरातील ५ ते ६ गावे मिळून मासेमारांनी मत्स्यसहकारी संस्था स्थापन केली. मत्स्य संस्थेचे सभासद येथे मासेमारी नियमानुार करू शकतात. सभासदांची संस्था सुद्धा कमी आहे. येथे देखरेख करणारे सध्या मालक बनले आहेत. चांदपूर तलावात नागपूरचा व्यापारी मासेमारी करीत असल्याची माहिती आहे. मागील काही वर्षापासून तो मासेमारी करीत असल्याची धक्कादायक माहिती आहे. सहकारातून मत्स्य उत्पादन करणे, विक्री करणे, स्थानिक मासेमारांना रोजगार प्राप्त व्हावा, परंपरागत व्यवसाय करण्याकरिता कमी किंमतीत हा तलाव संबंधित मत्स्य सहकारी संस्थेला दिला आहे. परंतु मत्स्य संस्थेचे सभासद ऐवजी दुसरी व्यक्तीने तलावावर नियमबाह्य कब्जा करणे सुरू केले. त्याकरिता येथील पदाधिकाऱ्यांनीच त्यला तलावावर मासेमारी करण्याची मुभा दिली आहे. संबंधित मत्स्य विभागाने येथे दखल घेतली नाही हे विशेष. यापूर्वी येथे या प्रकरणाची तक्रार करण्यात आली होती. परंतु काहीच झाले नाही. नियमानुसार निविदा काढणे, नुतनीकरण करणे येथे सुरू आहे. हे यंदाचे शेवटचे वर्षे आहे, असे समजते.
नागपूरच्या व्यापाऱ्याने चांदपूर तलावावर बस्ताण बसविले आहे. दरवर्षी लाखोंची मासे येथे पकडून विक्री केली जात आहेत. स्थानिक मासेमार मात्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. इतर सभासदांच्या अधिक्षित पणाचा येथे फायदा उचलणे सुरू आहे. केवळ व्यवसाय येथे कागदोपत्री दाखविणे सुरू आहे. निसर्गरम्य स्थळ, जैवविविधता तलाव परिसरात आहे. येथे सहकार देशोधडीला लागल्याचे दिसत आहे. स्थानिक मासेमार व नागपूरच्या व्यापाऱ्यांसोबत यापूर्वी संघर्ष झाला होता. त्याची सिहोरा पोलिसात तक्रार करण्यात आली होती. संघर्षात एका मासेमार सभासदावर ब्लेडने वार करण्यात आले होते.

चांदपूर तलावावर मत्स्य विभागाचे नियंत्रण असून संबंधित तलाव मत्स्य सहकारी संस्थेला भाडे तत्वावर दिला आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करण्यात येईल. दोषी आढळल्यास निश्चित कारवाई करण्यात येईल. संबंधित संस्थेचे हे शेवटचे वर्ष आहे. तलावावर कुणाचा कब्जा खपवून घेतला जाणार नाही.
-विश्वभर पसारकर,
प्रभारी मत्स्य उपआयुक्त, भंडारा.

Web Title: Capture of trader on Chandrapur lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.