गोंदिया-भंडारा जिल्ह्यात पिंजून काढावी लागणार १६०० गावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 14:15 IST2019-03-27T14:13:11+5:302019-03-27T14:15:15+5:30
भंडारा व गोंदिया हे दोन जिल्हे मिळून एकच लोकसभा क्षेत्र असल्याने जवळपास १,६०० गावात पोहोचताना उमेदवारांची दमछाक होणार आहे.

गोंदिया-भंडारा जिल्ह्यात पिंजून काढावी लागणार १६०० गावे
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भंडारा व गोंदिया हे दोन जिल्हे मिळून एकच लोकसभा क्षेत्र असल्याने जवळपास १,६०० गावात पोहोचताना उमेदवारांची दमछाक होणार आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघामध्ये मार्च महिन्यातील वातावरणातील ऊन्हासोबतच राजकीय वातावरण तापू लागले आहे. ११ एप्रिल ही मतदानाची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांच्या समर्थकांनी सोशल मीडियाच्या वापरात अग्रेसर दिसत आहेत.
कमी वेळेत समर्थक उमेदवारांचा प्रचार आणि विरोधक उमेदवारांचा नकारात्मक प्रचार वॉटस्अपच्या ग्रुपमधून वेगाने प्रसार सुरू आहे.अशावेळी कार्यकर्ते मात्र प्रचाराची धुरा सांभाळून घेत आहेत. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रचारसुद्धा हायटेक झाल्याचे दिसून येत आहे. फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियाचा प्रचारासाठी वापर वाढला आहे.गोंदिया-भंडारा लोकसभा क्षेत्रात सोमवारी एकूण ३४ जणांनी उमेदवार अर्ज दाखल केले आहेत. अर्ज मागे घेण्याची तारीख २८ मार्च आहे. यातील राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार मुख्य लढतीत राहणार असल्याने सोशल मीडियावरही त्यांचीच चलती आहे. यामध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी, भारतीय जनता पक्ष-शिवसेना युती या उमेदवारांत थेट लढत आहे. याशिवाय बहुजन समाज पार्टी यांचीही वोटबँक आहे. या पक्षांचे कार्यकर्ते स्वपक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जोमाने भिडणार आहेत.
प्रचार म्हटला की पूर्वीसारखे हातात झेंडे, पत्रके किंवा वाहनांवर भोंगे लावून प्रचार करण्याचा प्रकार आता संपला आहे. जमाना हायटेक झाला असून जुन्या पद्धतींना बाजूला सारून आता कार्यकर्ते स्मार्ट सिस्टमचा अवलंब करू लागले आहेत.
स्मार्ट फोनच्या माध्यमातूनच सर्वजण फेसबुक हँडल करीत आहेत, दुसरे म्हणजे सध्या गाजत असलेले व्हॉट्सअॅप संवाद साधण्याचे अतिमहत्वपूर्ण माध्यम बनले आहे. या व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आजची पिढी फोटो, मॅसेज, व्हीडियो क्लिप्स पाठवून एकमेकांच्या संपर्कात आहेत. नेमका या दोन प्रोग्रामचाच वापर सध्या प्रचारासाठी जोमात केला जाणार असण्याची चिन्हे आहेत.फेसबुक व व्हॉट्सअॅपवर आपापल्या पक्षांच्या उमेदवारांबाबत माहिती टाकून उमेदवारालाच पुढच्या व्यक्तीसमोर हजर केले जात आहे.
स्वपक्षातील उमेदवाराने किती कामे केलीत, निवडून आल्यावर काय करणार, आपल्यासाठी कशाप्रकारे फायदेशीर ठरणार यासह विरोधी उमेदवारांनी कशाप्रकारे फसवणूक केली, त्यांचा कार्यकाळ कसा फोल ठरला इतपत सर्व माहिती फेसबुक व व्हॉट्सअॅपवर शेअर केली जात आहे.
विशेष म्हणजे या हायटेक प्रचार माध्यमाचा फायदा असा की, कुणाच्याही नजरेत न येता केवळ मोबाईलच्या माध्यमातून हा सर्व खेळ सुरू आहे. त्यामुळे एकासाठी दुसऱ्यासोबत वितुष्ट येण्याच्या भितीपासूनही धोका नसल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.