कालव्याचे अस्तरीकरण उखडले
By Admin | Updated: October 30, 2015 00:44 IST2015-10-30T00:44:42+5:302015-10-30T00:44:42+5:30
खापा-काटेबाम्हणी शिवारात आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्प कालव्याच्या दोन्ही लाईनिंगस फुटलेल्या आहेत.

कालव्याचे अस्तरीकरण उखडले
निकृष्ट बांधकामाचा पुरावा: बावनथडी प्रकल्पांतर्गत उपक्रमाचा भाग
मोहन भोयर तुमसर
खापा-काटेबाम्हणी शिवारात आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्प कालव्याच्या दोन्ही लाईनिंगस फुटलेल्या आहेत. त्यामुळे कालवाच वाहून जातो की काय? असे चित्र दिसत आहे. प्रकल्पाच्या कालव्याचे बांधकाम निकृष्ट झाल्याचा हा पुरावाच म्हणावा लागेल. या कालव्याचे बांधकाम सहा वर्षापूर्वी झाले होते. यापूर्वी वरिष्ठ अधिकारी तथा चौकशी समितींनी पाहणी केली, परंतु अद्याप कुणावरही कारवाई झालेली नाही.
तुमसर, मोहाडी आणि भंडारा तालुक्यातील कायमस्वरुपी सिंचन व्यवस्थेसाठी सितेकसा येथे बावनथडी प्रकल्प बांधण्यात आला. सन २०१७ मध्ये हा प्रकल्प पूर्णत्वास येणार आहे. तुमसर-रामटेक महामार्गापासून हाकेच्या अंतरावर बावनथडी प्रकल्पाचा मुख्य कालवा तयार करण्यात आला. पाच वर्षापूर्वी या कालव्याची लाईनिंगची कामे करण्यात आली होती. सन २०१२ मध्ये प्रकल्पात पाणी साठवणूक करण्यात आले होते. सन २०१३ मध्ये प्रकल्पातून सिंचनाकरिता पाणी सोडण्यात आले त्यात अस्तरीकरण पाण्यात वाहून गेले. परिणामी या कालव्याला मोठमोठे भगदाड पडलेले आहेत.
खापा-काटेबाम्हणी शिवारात लाईनिंग फुटलेली असून खोल खड्डे पडले आहे. कालव्यात कुठे मोठे दगड घातलेले दिसतात. सध्या प्रकल्पाचे पाणी सिंचनाकरिता सोडले जात आहे. त्यामुळे कालवाच पाण्यात वाहून जाण्याची शक्यता बळावली आहे. या प्रकल्प बांधकामात अनियमितता झाल्याची चर्चा राज्यात आहे. या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी तथा समितींची नियुक्ती राज्य शासनाने केली होती. आता प्रकल्प पुर्णत्वाचा ध्यास राज्य शासनाने घेतला आहे.
केवळ पाच वर्षात लाईनिंग उखडली जात असेल तर त्या बांधकामाचा दर्जा कसा असेल यावरून दिसते. राज्य शासनाने प्रकल्प पाहणीकरिता नियुक्त केलेल्या अंदाज समितीने मागील महिन्यात पाहणी केली. त्याचा अहवाल हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत. या अधिवेशनात हा मुद्दा गाजणार की दबणार हे काळच सांगेल.