‘इन कॅमेरा’ झाले मन्वोवरचे शवविच्छेदन
By Admin | Updated: August 5, 2015 00:48 IST2015-08-05T00:48:10+5:302015-08-05T00:48:10+5:30
येथील राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या पंक्चर दुरूस्ती करणारा मन्वोवर अन्सारी याचा त्याच्याच दुकानात सोमवारला गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला होता.

‘इन कॅमेरा’ झाले मन्वोवरचे शवविच्छेदन
साकोली : येथील राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या पंक्चर दुरूस्ती करणारा मन्वोवर अन्सारी याचा त्याच्याच दुकानात सोमवारला गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला होता. मन्वोवरची आत्म्हत्या नसून तो खूनच असल्याची तक्रार मृतकाचा भाऊ मुनवर अन्सारी रा. नागपूर यांनी साकोली पोलीस ठाण्यात केली. त्यामुळे आज मंगळवारला मन्वोवरच्या मृतदेहाचे दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘इन कॅमेरा’ शवविच्छेदन करण्यात आले.
मन्वोवरचा मृतदेह काल दि.३ ला त्याच्याच दुकानात लुंगीने गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला होता. त्याच्या उजव्या पायातून रक्त निघत असल्याचे दिसत होते. घटनेची माहिती मिळताच मन्वोवरचे कुटुंबिय साकोली येथे पोहोचले. मात्र मन्वोवरचा मृतदेह संशयास्पद स्थितीत दिसत असल्यामुळे मृतकाचा भाऊ मनवर अन्सारी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. माझ्या भावाची आत्महत्या नसून त्याचा खून केल्याचा आरोप केला. त्यानंतर त्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचा देखावा रचण्यात आल्याचा आरोप केला. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी केली. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ.चंद्रशेखर मेश्राम व वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपेश बडवाईक यांनी ‘इन कॅमेरा’ मन्वोवरच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांना दिले. तपास साकोली पोलीस करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)