दररोज चार हजार क्विंटल धान खरेदी
By Admin | Updated: October 30, 2014 22:46 IST2014-10-30T22:46:13+5:302014-10-30T22:46:13+5:30
यावर्षी खरीप हंगामात लागवड करण्यात आलेल्या धानपिकाची कापणी सुरू झाली आहे. नवीन धान कृषी उत्त्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येत आहे. जिल्ह्यातील तुमसर कृषी उत्पन्न बाजार

दररोज चार हजार क्विंटल धान खरेदी
धान खरेदी केंद्र बंदच : तुमसर बाजार समितीत धान खरेदी सुरु
भंडारा : यावर्षी खरीप हंगामात लागवड करण्यात आलेल्या धानपिकाची कापणी सुरू झाली आहे. नवीन धान कृषी उत्त्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येत आहे. जिल्ह्यातील तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन धानाची खरेदी सुरू झाली असून सद्यस्थितीत या बाजार समितीत दररोज साडेतीन ते चार हजार क्विंटल धानाची खरेदी सुरू आहे.
तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितमीमध्ये चार दिवसांपूर्वी धान खरेदी सुरू करण्यात आली असून दररोज सरासरी चार हजार क्विंटल धान खरेदी सुरु आहे. ‘१००१’ आणि ‘१०१०’ या हलक्या प्रतीच्या धानाची कापणी सुरू आहे. बाजार समितीत हलका अर्थात ठोकळ धान विक्रीला येत आहे. बाजार समितीच्या सुत्रानुसार, नवीन धान विकणाऱ्या शेतकऱ्यांना चांगला भाव दिला जात आहे. बाजार समितीत येणाऱ्या धानाला गुणवत्तेच्या आधारावर प्रतिक्विंटल हजार ते बाराशे रुपये दिले जात आहे. परंतु हे दर शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत किंमतीपेक्षा कमी आहे.
मार्चपर्यंत ५८ कोटी धानखरेदी
जिल्ह्यात सन २०१३ मध्ये मागील हंगामातील धान खरेदी यावर्षी मार्च २०१४ पर्यंत सुरू होती. मार्चपर्यंत जिल्ह्यातील शासकीय धान खरेदी केंद्रांवर एकूण ४ लाख ४१, ५८४.५५ क्विंटल धान खरेदी करण्यात आली होती. त्या मोबदल्यात १०,३१९ शेतकऱ्यांना ५८ कोटी ९ लाख २३,५६६ रुपयांचे चुकारे वितरित करण्यात आले होते. (प्रतिनिधी)