दोन अस्वलांना जाळून मारले
By Admin | Updated: January 24, 2016 00:35 IST2016-01-24T00:35:55+5:302016-01-24T00:35:55+5:30
तणसीच्या ढिगाऱ्यात दोन अस्वलींची जाळून हत्या केली. ही गंभीर घटना अड्याळ वनपरिक्षेत्रातील किटाळी वनक्षेत्रात शुक्रवारी उघडकीस आली.

दोन अस्वलांना जाळून मारले
किटाळी सायगाव वनक्षेत्रातील प्रकार : तीन संशयितांची चौकशी सुरु, वन्यप्राण्यांची सुरक्षा वाऱ्यावर
विशाल रणदिवे अड्याळ
तणसीच्या ढिगाऱ्यात दोन अस्वलींची जाळून हत्या केली. ही गंभीर घटना अड्याळ वनपरिक्षेत्रातील किटाळी वनक्षेत्रात शुक्रवारी उघडकीस आली. या घटनेमुळे वनविभागात खळबळ उडाली आहे. किटाळी येथील हरिदास लक्ष्मण गेडाम व सायगाव येथील गणपत कानेकर यांच्या शेतातील तणसीच्या ढिगाऱ्यात या अस्वलींना जाळण्यात आले आहे. याप्रकरणी वनविभागाने तीन संशयीतांना वेगवेगळ्या ठिकाणाहून चौकशी करीता ताब्यात घेतले.
दोन दिवसापूर्वी विरली (खंदार) येथील पुरूषोत्तम वाघधरे यांच्या घरात दीड वर्षाचे अस्वलाचे पिल्लू शिरले होते. त्याला वनकर्मचाऱ्यांनी शिताफिने पकडले होते. वनविभागाच्या ताब्यात अस्वलाचे पिल्ले असल्याने वनविभागाने परिसरात दोन अस्वल असण्याची शक्यता वर्तविली होती. त्या दोन अस्वलांचा अड्याळ वनपरिक्षेत्रातील कर्मचारी व वन्यप्राणीमित्र शोध घेत होते. दरम्यान शुक्रवारला सायगाव येथील वनकर्मचारी एल.आर. कोरे यांना तणसीच्या ढिगाऱ्यात अस्वलांना जाळल्याचे दिसून आले. याची माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. घटनेचे गांभिर्य ओळखून वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट तात्काळ भेट दिली. प्रकरणाचे गांभिर्ण ओळखून त्यांनी तपासाला गती देत तीन संशयीतांना ताब्यात घेतले.
वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी वनविभागाने योजना आणल्या आहेत. मात्र, त्यांची वनविभागाकडून योग्य अंमलबजावणी होत नसल्याने वन्यप्राण्यांच्या जीवावर त्या बेतत असल्याचा प्रकार समोर येत आहे. जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या शिकारीचेही प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. मात्र, वनविभाग शिकारी टोळीवर नियंत्रण मिळविण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत.
अस्वलांना तणसाच्या ढिगाऱ्यात जाळणारी एक व्यक्ती शिकारी टोळीचा सदस्य तर नसावा, याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. मध्यप्रदेशातील शिकारी टोळींचे जिल्ह्यात प्रस्त आहे. त्यामुळे या दोन्ही अस्वलांची हत्या शिकारी टोळीने केली की ग्रामस्थांनी याबाबत वनविभाग ताब्यात घेतलेल्या व्यक्तींकडून चौकशी करीत आहेत. या घटनेमुळे वनविभागाने सतर्क राहून वन्यप्राण्यांचे संरक्षण करण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात वन्यप्राणी कागदावर दिसेल.
वन्यप्राणी अधिनियम १९७२ नुसार आरोपींना शिक्षा होईल. या घटनेची चौकशी सुरू असून या घटनेचा तपास किटाडीचे सहाय्यक वनरक्षक जी.डी. लुटे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
- महेश पाठक,
अड्याळ वनक्षेत्राधिकारी .