जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचे ओझे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:40 IST2021-02-05T08:40:09+5:302021-02-05T08:40:09+5:30
इंद्रपाल कटकवार भंडारा : अध्यापन कार्यासाठी शिक्षकांची नेमणूक केली जाते; परंतु काही वर्षांत संपूर्ण चित्रच बदलले आहे. शिक्षणाव्यतिरिक्त कामाच्या ...

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचे ओझे
इंद्रपाल कटकवार
भंडारा : अध्यापन कार्यासाठी शिक्षकांची नेमणूक केली जाते; परंतु काही वर्षांत संपूर्ण चित्रच बदलले आहे. शिक्षणाव्यतिरिक्त कामाच्या दडपणात जिल्हा परिषदेचे शिक्षक दबले गेल्याचे वास्तव समोर आले आहे. जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या १२९१ शाळांमधील ३५४३ शिक्षकांची ही स्थिती चिंतेत भर घालणारी आहे.
अशैक्षणिक कामांमुळे शिक्षक सतत गुंतलेले आणि काळजीत गुरफटलेले आढळतात. विशेषत: जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांचे अध्यापनेतर कामांमुळे मोठे हाल सुरू आहेत. जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळा खेड्यापाड्यांत आहेत. तेथील तीन हजारांपेक्षा जास्त शिक्षक अशैक्षणिक कामांनीच बेजार असल्याचे दिसून येते. विद्यार्थ्यांना शिकवायचे तरी कधी, असा त्यांचा सवाल आहे. यापूर्वी शिक्षकांनी याबाबत मोर्चेही काढले. मात्र प्रशासन केवळ ‘वरूनच तसा आदेश आहे, यात आम्ही काही करू शकत नाही,’ एवढे सांगून हात वर करीत आहे.
गत काही वर्षांत शिक्षकांच्या ऑनलाईन कामांत वाढ चालली आहे. मूलभूत सोयी-सुविधा न पुरवता, भौगोलिक स्थिती लक्षात न घेता शिक्षकांच्या माथी बसविलेल्या या कामांनी शिक्षकांची झोप उडवलीय. सरल पोर्टल सुरू झाले आणि ऑनलाईन कामांचे प्रमाणही वाढले. सर्व्हर अनेकदा डाऊन असतो. स्कूल पोर्टल, स्टुडंट पोर्टल, टीचर्स पोर्टल, शालेय पोषण आहार पोर्टल, शाळासिद्धी, स्वच्छ विद्यालय माहिती, दहाहून अधिक शिष्यवृत्त्यांची माहिती, यूडायस डेटा, गणवेश, प्रशिक्षणासाठी गुगल फॉर्मच्या लिंक्स भरणे, शालार्थ संगणक प्रणालीत पगार बिले तयार करणे, वृक्षारोपण, वाचन दिवस, फुटबॉल खेळ यांसारख्या वेगवेगळ्या दिवसांचे अहवाल देणे अशी अनेक कामे शिक्षकांवर येऊन पडल्याचे दिसत आहे.
कोरोना आणि निवडणूक कामात व्यस्तता अधिक
शिक्षक निवडणुकीच्या कामात तर अधिकच व्यस्त दिसतात. ग्रामपंचायतींच्या निवडणुका, त्यापूर्वी विधानसभेच्या निवडणुकांमध्ये शेकडो शिक्षकांची ड्यूटी लावण्यात आली होती. कोरोनाकाळात शिक्षकांना अक्षरश: कन्टेन्मेंट झोनमध्ये सर्वेक्षणाचे काम देण्यात आले होते. अनेक ठिकाणी परगावांतील नागरिकांच्या नोंदी घेण्यात सांगण्यात आले.
याशिवाय मतदार याद्या अद्ययावत करणे, त्यासाठी लोकांना माहिती देणे, गावातील लोक शौचालयाचा वापर करतात की नाही, याची माहिती घेणे, महसूल यंत्रणेसोबत निवडणुकीसाठी बूथ लेव्हल ऑफिसर म्हणून काम करणे, शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करणे, शाळेत दररोज शिजणाऱ्या पोषण आहारावर नजर ठेवणे, प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती एमडीएम पोर्टलवर नियमितपणे भरणे, आदी कामांचाही ताण असतोच.
शाळा सुरू असताना या कामांचा अध्यापनाला त्रास होतो. एक किंवा दोन शिक्षकी शाळांची तर मोठी अडचण निर्माण होते. दरवेळी शिक्षकांना भरपूर अशैक्षणिक कामे दिली जातात. त्यामुळे अनेकजण त्रस्त असतात. कोरोनामुळे प्राथमिक शाळाच बंद हाेत्या. प्रशासनाने काही कामे सोपविली, ती कामे शिक्षकांनी इमानेइतबारे केली आहेत.
- रमेश सिंगनजुडे, जिल्हाध्यक्ष, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटना
जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये मुख्याध्यापकाचे पदच मंजूर नाही. त्यामुळे अध्यापनासह इतर प्रशासकीय कारभार, अशैक्षणिक कामांचा भार शिक्षकांवर आहे. अनेकदा या कामात शिक्षकांना स्वत: खर्च करावा लागत असल्याचेही चित्र आहे. त्यात गावात इंटरनेटची रेंज नसली तर रात्री जागून मोबाईलवर ती माहिती भरणे, आदी कामांमुळे शिक्षक कायम तणावात राहत असल्याचेही दिसून येते.
४६२ दोन शिक्षकी शाळांचे हाल
जिल्ह्यात एकूण १२९१ शाळांपैकी सर्वच शाळा जिल्हा परिषदेच्या आहेत. त्यात ४६२ शाळांमध्ये केवळ दोन शिक्षक कार्यरत असल्याची माहिती आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात शाळा दोन शिक्षकी असल्याने येथे अशैक्षणिक कामे आल्यास अध्यापनाचे काम पूर्णपणे एकाच शिक्षकाच्या खांद्यावर येते.