आम आदमी योजनेचा भार शिक्षकांवर
By Admin | Updated: August 9, 2014 23:33 IST2014-08-09T23:33:33+5:302014-08-09T23:33:33+5:30
शासनाने सुरु केलेली आम आदमी विमा योजना कार्यान्वित करण्यासाठी शिक्षकांना कामाला लावल्याने तलाठ्यांचा भार शिक्षकांवर आला आहे.

आम आदमी योजनेचा भार शिक्षकांवर
कुंभली : शासनाने सुरु केलेली आम आदमी विमा योजना कार्यान्वित करण्यासाठी शिक्षकांना कामाला लावल्याने तलाठ्यांचा भार शिक्षकांवर आला आहे.
इयत्ता ९ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांना आम आदमी योजनेद्वारे शिष्यवृत्ती मिळावी याकरिता ही योजना तीन चार वर्षापूर्वी सुरु झाली. दरवर्षी शिक्षक आम आदमीचे अर्ज भरतात. परंतु एकाही विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. अर्जाची पूर्तता करण्यासाठी लागणारी कागदपत्रे राष्ट्रीयकृत बँकेचे खाते, आधारकार्ड, जमिनीचा प्रकार, तलाठ्याचे नाव, शिधापत्रिका, वडीलांची संपूर्ण माहिती गोळा करणे तलाठ्याचे काम आहे. परंतु शासनाने शिक्षकांना या कामात गुंतविल्यामुळे तलाठ्यांचा भार शिक्षकांच्या खांद्यावर आला आहे.या योजनेमुळे शिक्षकांना अध्यापनाचे काम सोडून या कामात अधिक वेळ द्यावा लागतो. त्यामुळे अध्यापनाचे कार्य बरोबर होत नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे नुकसान होते. तसेच पालकात संभ्रमावस्था निर्माण झाल्यामुळे लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता होत नाही. त्यामुळे या कामातून शिक्षकांची मुक्तता करावी अशी शिक्षकांची मागणी आहे. (वार्ताहर)