मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे कामकाज बंगल्यावरुन
By Admin | Updated: April 28, 2017 00:30 IST2017-04-28T00:30:33+5:302017-04-28T00:30:33+5:30
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे यांचे सध्याचे कार्यालय जिल्हा परिषदेमधील त्यांचे कक्ष नसुन त्यांचा शासकीय बंगला बनला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे कामकाज बंगल्यावरुन
प्रवेशद्वाराला कुलूप : अर्थपूर्ण व्यवहाराची कुजबूज
भंडारा : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे यांचे सध्याचे कार्यालय जिल्हा परिषदेमधील त्यांचे कक्ष नसुन त्यांचा शासकीय बंगला बनला आहे. त्यांच्या बदलीचे आदेश धडकल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद कार्यालयात उपस्थिती दर्शविली. जिल्हा परिषदमध्ये न राहता कामकाज त्यांनी बंगल्यारून सुरु केले आहे. शासकीय कामांच्या सर्व फाईल्स् बंगल्यावर बोलवत असून ‘अर्थपूर्ण’ फाईल्स् मार्गी लावण्याचा सपाटा लावला आहे.
ग्रामीण विकासाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिनी मंत्रालयाचे कर्णधार असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे यांची बदली झाली आहे. त्यामुळे येत्या कालावधीत त्यांना भंडारा मुख्यालय सोडून बदलीच्या ठिकाणी रूजू व्हायचे. मात्र जाण्यापूर्वी मागील वर्षभरापासून अडकलेल्या महत्त्वाच्या कामांचा फाईल्स् मार्गी लागाव्यात यासाठी त्यांची स्वाक्षरी महत्वाची आहे. पदोन्नती झाली असल्याने जिल्हा परिषदमधील कार्यालयात बसून कुठलेही प्रकरण अंगावर येऊ नये यासाठी त्यांनी नविन शक्कल लढविली आहे. जिल्हा परिषदमधील शासकीय कार्यालयात बसून काम करण्याऐवजी त्यांच्या बंगल्याला कार्यालय बनविले आहे. येथूनच सहा दिवसांपासून त्यांनी अनेक फाईल्स् मार्गी लावल्याचे समोर आले आहे. मात्र ज्या फाईल्स्ची ‘आर्थिक गुणवत्ता’ चांगली अशांनाच त्यांनी मार्गी लावल्याची कर्मचाऱ्यांमध्ये कुजबूज आहे. त्यांच्यार् काळातील थांबलेल्या फाईल्स यानिमित्ताने पुढे सरकत आहेत. याबाबत सीईओ अहिरे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. (शहर प्रतिनिधी)
प्रवेशद्वाराला कुलूप
सीईओ शरद अहिरे यांच्या शासकीय बंगल्याच्या प्रवेशद्वारात कुणीही येऊ नये याकरिता त्यांनी मुख्य प्रवेशद्वारालाच कुलूप लावले आहे. हे कुलूप केवळ रात्रीलाच नव्हे तर दिवसभर लावून राहते. या प्रवेशद्वाराजवळ एका शिपायाला बसविण्यात आले आहे. बाहेरुन कुणी फाईल्स् आणली तर ती नेवून देण्याची जबाबदारी या शिपायावर सोपविली आहे. रात्री जिल्हा परिषदमधील एका विभागाच्या शिपायाची पहिल्यांदाच नियुक्ती केली. या शिपायाला सीईओंनी बाहेर न जाण्याची चांगलीच तंबी दिल्याची बाब आज सकाळी उघडकीस आली. साहेबांच्या बंगल्यावर सकाळी व रात्रीला अनेकांची हातात फाईल्स् घेऊन असल्याची उपस्थिती दिसून येते.