मातीत राबण्यास बैल झाले सज्ज
By Admin | Updated: June 15, 2016 00:45 IST2016-06-15T00:45:51+5:302016-06-15T00:45:51+5:30
आपल्या कामाचे दिवस आले, उत्सवाचे दिवस आले की सर्वांना आनंद वाटतो. अशीच स्थिती प्रत्येक पशु-पक्ष्यांत आणि जनावरांमध्येसुध्दा पहायला मिळते.

मातीत राबण्यास बैल झाले सज्ज
शेतीच्या कामांना वेग : पेरणीच्या कामासाठी बळीराजाची तयारी
वरठी : आपल्या कामाचे दिवस आले, उत्सवाचे दिवस आले की सर्वांना आनंद वाटतो. अशीच स्थिती प्रत्येक पशु-पक्ष्यांत आणि जनावरांमध्येसुध्दा पहायला मिळते. पावसाळ्याचा पहिला पाऊस पडताच बैलांनासुध्दा आनंद वाटतो. आपली शिंगे मातीत गाडून चेहरा-मोहरा रंगवून बैल या नवीन हंगामाचा आनंद व्यक्त करताना दिसतात.
पावसाळ्याचे दिवस येताच बळीराजा सावधान होतो आणि आपल्या शेतीच्या कामाला लागून राहतो. शेतीचे कामे नसल्याने फेब्रुवारीपासून बैलांनासुध्दा आराम करायला मिळतो. उन्हाळा माणसालाच नाही तर जनावरांनासुध्दा कष्टदायी असतो. या काळात पिण्याच्या पाण्याची अडचण, चाऱ्यांची समस्या, उष्णतेचा उकाडा आदी समस्या निर्माण होत असल्याने उन्हाळ्याचे दिवस सर्वांनाच न आवडणारे असतात.
भारतीय संस्कृतीत शेती कामाला, सण उत्सवाला अशा अनेक कार्यात नक्षत्राला खूप महत्व दिले आहे. मृग नक्षत्र ७ जूनला लागल्यानंतर शेतीच्या कामाला वेग येतो. याच नक्षत्रात पेरण्याचे काम जोमात सुरू केले जातात.
रोहणी नक्षत्र आणि मृृग नक्षत्र आले की शेतीच्या कामाचे दिवस आल्याची भावना सर्वसामान्यात दृढ झाल्याचे दिसून येते. या नक्षत्रात भरपूर पाऊस आला तर बळीराजा सुखावला व आनंदीत झाला, अशी सर्वांची समजूत असते. यावर्षीसुध्दा रोहणी आणि मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसहीत जनावरातसुध्दा आनंद निर्माण झालेला आहे.
रोहिणीचे पाणी पडले तेव्हा बैलांनासुध्दा आनंद झालेला आहे. बैलांना असा आभास झाला असावा की, आता आपल्या कामाचे दिवस आलेत. म्हणजेच बैलांच्या श्रमाचे दिवस जवळ आलेले आहेत.
(वार्ताहर)