बनावट अंदाजपत्रकावर बांधले ‘वनतलाव’!
By Admin | Updated: February 16, 2016 00:41 IST2016-02-16T00:41:32+5:302016-02-16T00:41:32+5:30
मोहाडी तालुक्यातील जामकांद्री वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या शिवनी येथे चार वनतलावांचे बांधकाम करण्यात आले.

बनावट अंदाजपत्रकावर बांधले ‘वनतलाव’!
मोहाडी तालुक्यातील शिवणी येथील प्रकार : बांधकामावरील मातीमिश्रीत मुरूमाची विक्री
प्रशांत देसाई भंडारा
मोहाडी तालुक्यातील जामकांद्री वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या शिवनी येथे चार वनतलावांचे बांधकाम करण्यात आले. मात्र, हे बांधकाम बनावट अंदाजपत्रकावर करण्यात आले आहे. या वनतलावातून निघालेल्या मातीमिश्रीत मुरूमाचीही परस्पर विल्हेवाट लावण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
उन्हाळ्यात वन्यप्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होऊ नये, यासाठी वनविभागाच्यावतीने जंगलात वनतलावांची निर्मिती करण्यात येते. भंडारा उपवनसंरक्षक कार्यालयांतर्गत येणाऱ्या वनपरिक्षेत्र जाम कांद्रीच्या सहवनक्षेत्र आंधळगांव अंतर्गत संयुक्त वनव्यवस्थापन समिती शिवनीच्या माध्यमातून शिवनी येथे चार ठिकाणी पाणी साठवण तलावांचे बांधकाम करण्यात आले. या बांधकामाला प्रशासनाने १८ मार्च २०१५ ला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. २०१४-१५ चे मंजूर कामे सुरू असून काही कामे पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले आहे.
मात्र, बांधकाम करण्यात आलेल्या वनतलावांच्या मंजुरीसाठी बनावट अंदाजपत्रक दाखविण्यात आले आहे. हिवरा बिटाच्या वनतलावाच्या अंदाजपत्रकावर ‘नोटशिट’ लावून त्या अंदाजपत्रकाला मंजुरी प्राप्त करून घेण्यात आलेली आहे.
बनावट अंदाजपत्रकावर वनविभागाने शिवणी येथील चार वन तलावालापैकी दोन तलावांना प्रत्येकी २ लाख ९३ हजार ३०० तर दोन तलावांना प्रत्येकी २ लाख ९३ हजार ४०० रूपये मंजूर करण्यात आले. बनावट अंदाजपत्रकावर चारही वनतलावाचे बांधकाम सुरू असून या बांधकामात अनियमितता आहे. तलावाचे बांधकाम खोलगट भागात व्हायला पाहिजे, मात्र, बांधण्यात आलेले तलाव हे उंच भागावर बांधण्यात आलेले आहे. याशिवाय वनतलाव बांधकामातून निघालेला मातीमिश्रीत मुरूम नियमानुसार बाहेर नेणे किंवा विक्री न करणे, असा नियम असताना या कामावरील मातीमिश्रीत परस्पर विकण्यात आला आहे.
५०० ट्रॅक्टर मुरूमाची नियमबाह्य विक्री
वनविभागाच्या हद्दीतील साहित्य त्यांच्या परवानगीविना इतरत्र हलविता येत नाही. तलावाच्या बांधकामावरील मातीमिश्रित मुरूमाची वनाधिकाऱ्यांनी परस्पर विक्री केली आहे. चारही कामावरील सुमारे ५०० ट्रॅक्टर मुरूम लगतच्या गावातील ग्रामपंचायतीने तर काही नागरिकांनी विकत घेतला आहे.
बांधकामात अनियमितता
चारही वनतलाव १०० बाय १०० आकाराचे बांधावयाचे आहेत. हे तलाव उतार भागात बांधणे गरजेचे असून यामुळे तलावात पावसाळ्यात पाणी जमा होण्यास मदत होईल. या तलावातील पाणी बाहेर जाण्यासाठी ‘इनपूट आऊटपूट’ बांधण्यात आले नाही. उंचीवर बांधकाम करण्यात आल्याने पाणी साठवण क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बांधकाम यांत्रिक साहित्यातून
वनतलावाची कामे वन व्यवस्थापन समितीच्या पंजीकृत समितीचे सभासदाकडून करून घेण्याचे निर्देश उपवनसंरक्षकांनी दिले आहेत. मात्र, या निर्देशाचे पालन न करता तलावाचे काम जेसीबीच्या मदतीने करण्यात आले. तलावाचे दगडाने पिचिंग करणे व पायऱ्या बांधणे गरजेचे आहे. परंतु दगडाचा वापर न करताच तलावात पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे येथे पाणी पिण्यासाठी आलेल्या जनावरांचा चिखलात पाय फसून मृत्यू होण्याची भीती आहे.
शिवनी हे गाव जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट आहे. शासनाच्या निर्देशानुसार हे वनतलाव जलयुक्त शिवार योजनेतून बांधण्यात आले. याकामासाठी जिल्हाधिकारी व उपवनसंरक्षक यांचे मंजूरी पत्र आहे. त्यांच्या निर्देशानुसार चारही तलावांचे कामे करण्यात आली आहे. मुरूम विकण्यात आलेला नाही. याबाबत संबंधीत गावातील १६ ते १७ नागरिकांचे बयान नोंदविण्यात आलेले असून या संपूर्ण कामात पारदर्शकता आहे.
- डी. पी. चकोले, वनपरिक्षेत्राधिकारी, शिवनी.
हिवरा बिटाच्या वन तलावाच्या अंदाजपत्रकावर शिवनीत चार वन तलाव बांधण्यात आली. तत्कालीन वनाधिकाऱ्यांनी कामांचे बांधकाम थांबविले होते. मात्र, वर्तमान वनाधिकाऱ्यांनी या कामांना मंजुरी दिली. कामावरील मुरूम शिवनी व सालेबर्डी ग्रामपंचायत व खासगी ठिकाणी विकण्यात आले आहे. याची चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी.
- विजय शहारे, जिल्हाध्यक्ष, मनसे, भंडारा.