खेळातून जागतिक स्तरावर ओळख निर्माण करा

By Admin | Updated: December 14, 2015 00:33 IST2015-12-14T00:33:01+5:302015-12-14T00:33:01+5:30

क्रीडा स्पर्धा या जगामध्ये सामर्थ्यशाली देश म्हणून ओळखण्याचे प्रभावी माध्यम आहे. खेळाडूंनी जागतिकस्तरावरील क्रीडा स्पर्धेत कीर्तिमान होण्यासाठी धैर्य, चिकाटी महत्त्वाकांक्षा व मेहनत करणे आवश्यक आहे,

Build globally with the game | खेळातून जागतिक स्तरावर ओळख निर्माण करा

खेळातून जागतिक स्तरावर ओळख निर्माण करा

नाना पटोले यांचे आवाहन : राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत आठ विभागातील स्पर्धक सहभागी
भंडारा : क्रीडा स्पर्धा या जगामध्ये सामर्थ्यशाली देश म्हणून ओळखण्याचे प्रभावी माध्यम आहे. खेळाडूंनी जागतिकस्तरावरील क्रीडा स्पर्धेत कीर्तिमान होण्यासाठी धैर्य, चिकाटी महत्त्वाकांक्षा व मेहनत करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात आयोजित राज्यस्तरीय बॉक्सिंग व व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी अतिथी म्हणून आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, क्रिडा उपसंचालक ना.गा. माटे, नागपूर विभागाचे उपसंचालक सुभाष रेवतकर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार, महर्षी विद्या मंदिरचे प्राचार्य श्रुती ओहळे, शिवछत्रपती राज्य पुरस्कारार्थी प्रा.अशोक राजपुत, जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थी मोहन दाढी, व्हॉलीबॉल जिल्हा संघटनेचे सुनिल करंजेकर, नईम कुरेशी उपस्थित होते.
यावेळी खा.नाना पटोले यांच्या हस्ते ध्वज फडकावून क्रीडा ज्योत प्रज्वलीत करण्यात आली. यावेळी आठ विभागातील खेळाडूंनी पथसंचालनाद्वारे मानवंदना दिली. उद्घाटनप्रसंगी महर्षी विद्यामंदिरच्या विद्यार्थिनींनी लोकनृत्य सादर केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग व राजीव गांधी खेळ अभियान अंतर्गत ग्रामीण महिला व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी आमदार रामचंद्र अवसरे म्हणाले, जीवनात हारजीत होत असते. खेळाडूंमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना असली पाहिजे. अपयश आले तरी निराश होऊ नये. आत्मविश्वास बाळगणे आवश्यक आहे. प्रास्ताविकेतून सुभाष रेवतकर, यांनी क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी खेळाडू, मार्गदर्शक, संघटक, क्रीडा शिक्षक, क्रीडाप्रेमी या सर्वांचेच योगदान असल्याचे सांगितले. स्पर्धांचा निकाल प्राप्त होताच राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघाची व खेळाडूंची घोषणा करण्यात येईल असे जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार यांनी सांगितले. संचालन प्रेमदास लांजेवार यांनी तर आभार क्रिडा अधिकारी मदन टापरे यांनी मानले. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Build globally with the game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.