विविध समस्यांसाठी बसपाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:24 IST2021-07-21T04:24:13+5:302021-07-21T04:24:13+5:30
भंडारा जिल्हा हा नैसर्गीक साधन संपत्तीने समृद्ध आहे. मात्र त्या तुलनेत जिल्ह्यात पर्यटन व औद्योगिक विकास झालेला नसून आजही ...

विविध समस्यांसाठी बसपाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
भंडारा जिल्हा हा नैसर्गीक साधन संपत्तीने समृद्ध आहे. मात्र त्या तुलनेत जिल्ह्यात पर्यटन व औद्योगिक विकास झालेला नसून आजही जिल्हा रोजगाराच्यादृष्टीने मागास राहिलेला आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. मात्र निवडणुकीपुर्वी दिलेली आश्वासने आता प्रत्यक्षात पूर्ण होत नसल्याने तरूणांसह शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेवून भंडारा शहरासह जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी यावेळी निवेदनातून इंजि. नासरे यांनी केली आहे.
भंडाराचे रेल्वे स्थानक हे शहरापासून दूर अंतरावर वरठी येथे आहे. त्यामुळे प्रवाशांची नेहमीच गैरसोय होत आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेवून रेल्वे स्थानक हे शहरात आणण्याची गरज आहे. अनेकदा ट्रेन उशिरा आल्यानंतर गोंदिया व नागपूर जिल्ह्यातून अपडाऊन करणारे शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना रात्री बसेस अथवा ॲटो अभावी वरठी ते भंडारा प्रवास काहीप्रसंगी पायीच करावा लागतो. अन्यथा आपल्या खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो, ही वस्तुस्थिती आहे.
भंडारा शहरात रेल्वे समिती बनविली आहे. मात्र लोकप्रतिनिधींनी भंडारा शहरात रेल्वे स्थानक आणण्याची केलेली घोषणा हवेत विरली आहे. मागील काही वर्षात वरठी ते जवाहनगर असलेला २२ कि.मी.ची रेल्वे पटरी उखडून काढण्यात आली. मात्र हा प्रश्नही अद्याप प्रलंबित आहे. केंद्रीय परिवहन मंत्र्यांनी नुकतेच वरठीपर्यंत मेट्रो रेल्वे येत असल्याचे सुतवाच केले आहे. त्यामुळे ही मेट्रो भंडारा शहरातून सुरू झाल्यास नागरिकांना सोयीचे होणार आहे. याशिवाय शासनाला महसूल देखील प्राप्त होवू शकतो. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर सर्वसामान्यांना वरठीला जावून नागपूरला जाणे खर्चिक ठरत आहे.
अनेक तालुक्यांना भंडारा शहरात रेल्वे स्थानक आल्यास सोयीचे होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कृषी, शैक्षणिक, औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी यापुर्वीही प्रशासनाला निवेदन दिले आहेत. यासाठी गेल्या काही दिवसापासून प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे होत असलेले दुर्लक्ष यामुळे सामान्य जनतेला त्रास होत आहे. त्यामुळे सर्व सामान्यांचा विचार करून रेल्वे मेट्रोची सुविधा वरठी ते भंडारा शहरापर्यंत पुरविण्यात यावी, अशी मागणी बहुजन समाज पार्टी जिल्हा शाखा भंडाराच्यावतीने झोन प्रभारी इंजि. संजय नासरे, प्रदेश सचिव प्रा. जय मेश्राम, संघटनमंत्री यशवंत वैद्य, उमराव सेलोकर, डॉ. भैय्यालाल मेश्राम, गिरीष गजभिये, मनिषा गजभिये, हेमा गजभिये, भीमराव लोखंडे, चंद्रमणी गोंडाने यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केली आहे.
बॉक्स
भंडारा शहरातून मेट्रो रेल्वे सुरू करा
सर्वच तालुक्यांच्या दृष्टीने भंडारा शहर हे सोयीचे आहे. यासाठी शासनासह लोकप्रतिनिधींनी वरिष्ठस्तरावर दखल घेवून मेट्रो रेल्वे भंडारा शहरातून सुरू करावी. यामुळे सामान्यांना दिलासा मिळून विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर, शासकीय व खाजगी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोयीचे ठरणार आहे. यासाठी भंडारा शहरात मेट्रो सुरू व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.