बहिणीवर चाकूहल्ला करून भावाने घेतले विष, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2022 12:07 PM2022-05-17T12:07:21+5:302022-05-17T12:13:27+5:30

या घटनेची पोलिसात तक्रार देण्यात आली. आता आपल्यावर कारवाई होईल या भीतीने भाऊ गोविंदाने सोमवारी सकाळी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला

brother try to commit suicide by drinking poison after stabbing sister and family dispute | बहिणीवर चाकूहल्ला करून भावाने घेतले विष, गुन्हा दाखल

बहिणीवर चाकूहल्ला करून भावाने घेतले विष, गुन्हा दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देमांढळची घटना : वास्तू पूजन सोहळ्यासाठी आली होती बहीण

लाखांदूर (भंडारा) : वास्तू पूजन सोहळ्यासाठी माहेरी आलेल्या बहिणीसोबत मुलाच्या लग्नावरून झालेल्या वादात भावाने बहिणीवर रविवारी चाकू हल्ला करून गंभीर जखमी केले. तर सोमवारी सकाळी स्वत: भावानेही विष पिल्याची घटना तालुक्यातील मांढळ येथे घडली. दोघा बहीण-भावावर उपचार सुरू आहेत. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

मैना दादाजी चंडीमेश्राम (६०, रा. जुनोना, ता. पवनी) जखमी बहिणीचे नाव आहे. तर गोविंदा अर्जुन कांबळे (५५, रा. मांढळ) विष पिणाऱ्या भावाचे नाव आहे. गोविंदाचा मुलगा महेश गत १४ वर्षांपासून आत्या मैनाकडे राहतो. मैनाने भाचा महेशचे लग्न करून दिले. तसेच त्याला घरही बांधून दिले. मात्र, बहिणीने आपल्याला विश्वासात घेतले नाही, याचा राग गोविंदाच्या मनात होता. दरम्यान, रविवारी भावाच्या घरी वास्तू पूजन कार्यक्रमासाठी मैना मांढळ येथे आली. त्यावेळी गोविंदा व त्याच्या पत्नीने वाद उकरून काढला. त्यावर बहिणीने हटकले असता, भावाने चक्का बहिणीच्या पाठीवर चाकूने वार केले. त्यात ती गंभीर जखमी झाली. तिला लाखांदूर येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या घटनेची पोलिसात तक्रार देण्यात आली. आता आपल्यावर कारवाई होईल या भीतीने भाऊ गोविंदाने सोमवारी सकाळी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. विष घेतल्याचे माहीत होताच कुटुंबीयांनी गोविंदाला तत्काळ लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

भाऊ, भावजयीविरुद्ध गुन्हा दाखल

मैना चंडीमेश्राम यांच्यावर चाकू हल्लाप्रकरणी त्यांच्या मुलाने लाखांदूर ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून गोविंदा कांबळे व त्यांच्या पत्नीच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार दिलीप भोयर व पोलीस अमलदार अनिल राठोड करीत आहेत. वास्तू पूजन राहिले बाजूला आणि बहीण-भावात वाद होऊन चाकू हल्ला आणि विष पिल्याची सोमवारी दिवसभर चर्चा लाखांदूर तालुक्यात होती.

Web Title: brother try to commit suicide by drinking poison after stabbing sister and family dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.