भावाने केला भावाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2016 00:21 IST2016-09-03T00:21:11+5:302016-09-03T00:21:11+5:30

क्षुल्कशा कारणावरून झालेला शाब्दिक वाद विकोपाला जावून या वादाचे पर्यावसान दोन भावाच्या मारहाणीत झाले.

Brother killed his brother | भावाने केला भावाचा खून

भावाने केला भावाचा खून

खुनारी येथील घटना : घरगुती वाद बेतला जीवावर 
पालांदूर : क्षुल्कशा कारणावरून झालेला शाब्दिक वाद विकोपाला जावून या वादाचे पर्यावसान दोन भावाच्या मारहाणीत झाले. दरम्यान एकाने दुसऱ्याच्या डोक्यावर काठीने जोरदार प्रहार केल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारला सकाळी ८.४५ च्या सुमारास लाखनी तालुक्यातील खुनारी या गावात घडली. खुनारी गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.
पंढरी राघो चुटे (४५) असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी पांडुरंग चुटे (४८) व गोपीका पांडुरंग चुटे (४५) या दोन आरोपींना भांदवि ३०२, ३४ कलमान्वये अटक करण्यात आली. शुक्रवारला सकाळी पंढरी व गोपीका चुटे यांच्यात कपडे धुतलेले पाणी फेकण्यावरून शाब्दिक वाद झाला. त्यावेळी पांडुरंग घरी नव्हता. पंढरी घरासमोरच्या रस्त्यावर बसून होता. पांडुरंग घरी पोहोचताच गोपीकाने पंढरीशी झालेला वाद सांगितल्यानंतर पांडुरंगचा राग अनावर होऊन त्याने हातात काठी घेऊन पंढरीच्या पाठमोऱ्यादिशेने डोक्यावर सपासप वार केले. यात पंढरी जमिनीवर कोसळला. रक्त वाहू लागल्यामुळे पांडुरंग घटनास्थळाहून पसार होत पालांदूर पोलीस ठाण्यात शरण जावून घटनेची कबुली दिली.
त्यानंतर गावातील वातावरण तापले. सरपंच व ग्रामस्थांनी पांडुरंग चुटे याला आमच्या समोर हजर करा, अशी भूमिका घेत घटनास्थळाहून मृतदेह उचलण्यासाठी नकार दिला. पोलिसांनी कायदेशिर कारवाई करण्याचे आश्वासन देऊनही संतप्त गावकरी पोलिसांचे म्हणने एैकायला तयार नव्हते. आरोपी पांडुरंगची पत्नी गोपीका ही घरी असल्याने तिच्यावर रोष व्यक्त करीत संतप्त महिला तिच्या घरी जाण्यासाठी निघाले. मात्र पोलिसांनी संरक्षण दिल्याने अनुचित घडले नाही. प्रकरण चिघळत असल्याचे लक्षात येताच पालांदूर पोलिसांनी उपविभागीय पोलिस अधिकारी मोहनदास संखे यांना घटनेची माहिती देताच ते ताफ्यासह घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी सरपंच व ग्रामस्थांना समजाविण्याचा प्रयत्न केला. पण तो व्यर्थ ठरला. अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी घटनास्थळाला भेट देऊन मृतक पंढरी चुटे यांच्या पत्नी व मुलाची भेट घेऊन आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सरपंच हेमंतकुमार सेलोकर, मृतकाचे साले विलास कोरे झरप, पोलीस पाटील बबन भेंडारकर, मधु कोरे, विलास चुटे, वैशाली चुटे, भागवत शिवणकर यांनी केली. घटनेचा तपास ठाणेदार मनोज वाढीवे हे करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Brother killed his brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.