एक रोपटे आणा ५० रुपये घेऊन जा
By Admin | Updated: June 29, 2016 00:42 IST2016-06-29T00:42:34+5:302016-06-29T00:42:34+5:30
केंद्र तथा राज्य शासनाने वृक्षारोपणाचा ध्यास घेतला आहे. तर चिखला येथील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना एका झाडाचे रोपटे आणून द्या व ५० रुपये न्या.

एक रोपटे आणा ५० रुपये घेऊन जा
ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम : चिखला गाव हिरवेगार करण्याचा सोडला संकल्प
तुमसर : केंद्र तथा राज्य शासनाने वृक्षारोपणाचा ध्यास घेतला आहे. तर चिखला येथील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना एका झाडाचे रोपटे आणून द्या व ५० रुपये न्या. असा अनोखा उपक्रम सुरु केला आहे. ग्रामस्थांमध्ये येथे चढाओढ लागली असून संपूर्ण गाव हिरवेगार करण्याचा संकल्प ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
तुमसरपासून २५ कि.मी. अंतरावर चिखला हे गाव आहे. या गावाशेजारी जगप्रसिद्ध मॅग्नीज खाणी (भूमीगत) आहेत. गावाची लोकसंख्या सुमारे चार हजार इतकी आहे. डोंगराळ परिसर असून सातपुडा पर्वत रांगात हा परिसर येतो. परंतु मागील काही वर्षापासून हा परिसर उजाड झाला आहे. हिरवे पहाड ही उजाड पडले आहेत. झाडांना नष्ट करण्याकरिता शेकडो जण येतात. परंतु झाडे लावण्याकरिता शेकडो हात कसे पुढे सरसावतील याकरिता चिखला येथील सरपंच उमा सेनकपाट व तरुणतुर्क उपसरपंच दिलीप सोनवाने तथा ग्रामपंचायत सदस्यांनी एक नवीन शक्कल लढविली व ती येथे यशस्वी होताना दिसत आहे.
गावातील ग्रामस्थांनी एका झाडाचे रोपटे आणले तर त्यांनी ५० रुपये प्रती रोपटे ग्रामपंचायत चिखला देणार आहे. याचा परिणाम इतका झाला की चिखला येथे बऱ्याच कुटुंबांनी रोपटे लावणे सुरु केले आहे. शासनाकडून विनामुल्य झाडे न घेता ग्रामस्थांकडून घेऊन संपूर्ण गाव व परिसर हिरवेगार करण्याचा संकल्प केला आहे. चिखला या गावापासून इतर गावांशी वसा घेण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)