पुलाचे बांधकाम अर्धवट
By Admin | Updated: October 7, 2015 01:54 IST2015-10-07T01:54:16+5:302015-10-07T01:54:16+5:30
देव्हाडी-माडगी रस्त्यावर २० लक्ष रूपये खर्च करून आयुष्य संपलेल्या पुलाचे नव्याने बांधकाम करण्यात आले.

पुलाचे बांधकाम अर्धवट
देव्हाडी येथील प्रकार : डांबरीकरणाची गरज
तुमसर : देव्हाडी-माडगी रस्त्यावर २० लक्ष रूपये खर्च करून आयुष्य संपलेल्या पुलाचे नव्याने बांधकाम करण्यात आले. या पूलासमोर बावनथडी वितरिका आहे. यात पूलाची उंची या वितरिकेपेक्षा कमी आहे. वितरिका व पूलादरम्यान पिचिंग व डांमरीकरण न झाल्याने हा मार्ग निसरडा झाला आहे. यामुळे येथे अपघाताची शक्यता बळावली असून हा रस्ता असुरक्षित बनला आहे.
देव्हाडी-माडगी हा तीन कि़मी. चा रस्ता असून देव्हाडी शिवारात याच महिन्यापुर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत २० लाख खर्च करून नवीन पूल तयार करण्यात आला. येथे यापूर्वी आयुष्य संपलेला पूल होता. या पुलासमोर १० ते १५ मिटर पुढे बावनथडी प्रकल्पाची वितरिकेचे काम करण्यात आले. ही वितरिका पूल उंच आहे तर रस्त्यावरील नवीन पूल खाली आहे. वितरिका ते पुलाचा मार्ग यामुळे निसरडा झाला आहे. येथे दगड घालून संबंधित विभागाने पिचिंग व डांमरीकरण तात्काळ करणे गरजेचे होते, परंतु निधी अपुरा पडल्याने ही कामे झाली नाही, अशी माहिती आहे. रात्री हा रस्ता वाहनधारकांकरिता असुरक्षित ठरत आहे. तत्पूर्वी हा रस्ता जिल्हा परिषदेकडे होता, परंतु जिल्हा परिषदेकडे निधीची कमतरता राहत असल्याने हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडे (राज्य) वर्ग करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)