१२२ गावांमध्ये ४१९ घरांची पडझड
By Admin | Updated: July 24, 2014 23:42 IST2014-07-24T23:42:40+5:302014-07-24T23:42:40+5:30
मागील तीन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील चार तालुक्यामधील १२२ गावांमध्ये ४१९ घरांची अंशत पडझड झाली आहे. अनेक गावात पुराचे पाणी शिरल्यामुळे नदीकाठावरील गावांना फटका बसला आहे.

१२२ गावांमध्ये ४१९ घरांची पडझड
भंडारा : मागील तीन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील चार तालुक्यामधील १२२ गावांमध्ये ४१९ घरांची अंशत पडझड झाली आहे. अनेक गावात पुराचे पाणी शिरल्यामुळे नदीकाठावरील गावांना फटका बसला आहे. यात ३२ लाख रुपयांचे नुकसान झाले. सर्वाधिक फटका तुमसर तालुक्यातील सिंदपुरी या गावाला बसला असून आजही तिथे घरे पाण्यात आहेत.
जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे दि. २३ जुलै रोजी अनेक मार्ग बंद पडलेले आहेत. यात लाखांदूर तालुक्यातील लाखांदूर ते वडसा मार्गे चप्राड, लाखांदूर, बारव्हा ते तई, दांडेगाव ते मासळ, बोथली ते मासळ हे मार्ग सकाळी ८ वाजेपासून बंद झाले आहेत. मार्ग बंद असल्यामुळे दुसरे पर्यायी मार्गांनी वाहतूक सुरु केली आहे. भंडारा तालुक्यातील गणेशपूर ते कोरंभी, भिलेवाडा ते सुरेवाडा, करचखेडा ते सिरसघाट, सिंगोरी ते चांदोरी, पहेला ते गोलेवाडी, अर्जुनी ते जामगाव हे मार्ग बंद झालेले आहेत. पवनी तालुक्यातील कोदुर्ली ते भोजापूर मार्ग सकाळी ११ वाजता बंद झाले आहे.
मोहाडी तालुक्यातील मोहाडी ते तुमसर मार्ग बंद झाले होते. साकोली तालुक्यातील पळसगाव ते सुकळी मार्ग, विर्सीफाटा ते विर्सी मार्ग दुपारी १२ वाजता बंद झाले. तुमसर तालुक्यातील वाहणी ते परसवाडा, सिलेगाव ते परसवाडा, वाहनी ते सिलेगाव हे मार्ग बंद आहेत. मोहाडी तालुक्यातील टांगा ते विहिरगाव, रोहा ते रोहणा, मोहाडी ते मांडेसर, दहेगाव ते रोहणा बेटाळा, मोहाडी ते कुशारी, आंधळगाव ते वडेगाव हे मार्ग नाल्यावर पाणी आल्यामुळे बंद करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त माहितुीनुसार, दि. २१ ते २३ जुलै दरम्यानच्या पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. भंडारा तालुक्यात ८ गावांमध्ये १३ घरे अंशत: पडलेली आहेत. यामुळे १ लक्ष २४ हजार २०० रुपयांचे नुकसान झाले आहे. २ घरे पूर्णत: पडल्याने ८० हजार रुपयाचे नुकसान झाले. लाखनी तालुक्यातील ८ गावामध्ये ११ घरे अंशत: पडले यात १ लक्ष २७ हजार ८५० रुपयाचे नुकसान झाले. १ घरांचे पूर्णत: पडल्याने ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. पवनी तालुक्यात ७ गावामध्ये ११ घरे अंशत: पडली. यात ६५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन घरे पूर्णपणे पडल्याने ७० हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.
भंडारा तालुक्यातील वैनगंगा नदीच्या काठावरील कारधा गावातील २ कुटुंबातील ९ व्यक्तींना सुरक्षित हलविण्यात आले. गणेशपूर नाल्यावर पुराचे पाण्याची थोप आल्याने २ कुटुंबातील ८ व्यक्तींना सुरक्षित जागेवर हलविण्यात आले आहे.
(शहर प्रतिनिधी)